'बिहार निकालांचा आकस न ठेवता, राज्यात छटपूजेला संमती द्या'; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कृष्ण जोशी | Wednesday, 11 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारी जनतेने शिवसेनेला नाकारले असले तरी त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही आकस न ठेवता छटपुजेला संमती द्यावी, असा टोला भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

मुंबई ः बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारी जनतेने शिवसेनेला नाकारले असले तरी त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही आकस न ठेवता छटपुजेला संमती द्यावी, असा टोला भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

हेही वाचा - यंदा फटाक्यांवर संक्रांत, मश्जिद बंदरमधली फटाक्यांची दुकाने रिकामीच

उत्तर भारतीय व त्यातही बिहारी भाविकांसाठी महत्वाचा असलेला छटपुजेचा सण येत्या 20 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. सध्या कोरोनाच्या साथीमुळे अन्य सर्वधर्मीय सण नेहमीच्या जोषात साजरे न होता अत्यंत साधेपणाने पार पडले. काही सणांना तर परवानगी मिळाली नाही, दिवाळीतही रस्त्यांवर फटाके उडवण्यास बंदी लादण्यात आली आहे. त्यामुळे छटपुजेला संमती मिळेल का, तसेच कशा प्रकारे पूजा करण्याबाबत निर्बंध असतील, याची उत्सुक्तता आहे. 

Advertising
Advertising

सामान्यतः छटपूजा म्हणजे जलाशयाजवळ म्हणजे विहीर, नदी, तलाव, समुद्र येथे सारे भाविक एकत्र जमून सूर्याची पूजा करतात. भाविकांच्या श्रद्धेचा विषय ध्यानात घेऊन राज्यात छटपूजेला संमती द्यावी. त्यासाठी आरोग्यविषयक तसेच सोशल डिस्टन्सिंगविषयक नियम व अटी असल्या तरीही हरकत नाही. त्या पाळून भाविक पूजा करतील, त्यादृष्टीने संमती द्यावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. 

हेही वाचा - राज्यातील सर्व कोचिंग क्लास सुरु करणार; कारवाई झाल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा

कालच निकाल जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बिहारी जनतेने नाकारल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तरीही आपण त्याचा कोणत्याही प्रकारचा आकस मनात न धरता भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून छटपूजेला संमती द्यावी, असा चिमटाही भातखळकर यांनी काढला आहे. आपण गेले अकरा महिने ज्या `सुसंस्कृतपणे` आणि `उदार` मनाने राज्याचा कारभार चालवीत आहात, त्याच न्यायाने छटपूजेला संमती द्यावी, असा शालजोडीतला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Consent to Chhatpuja in the state BJPs demand to the Chief Minister

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )