महापालिका प्लास्टिकला किंमत देण्याच्या विचारात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

मुंबई - कचऱ्यातील प्लास्टिकला किंमत मिळाली, तर हे प्लास्टिक नाल्यांमधून समुद्रात जाणार नाही, हे लक्षात घेऊन महापालिका प्लास्टिक खरेदीसाठी योजना तयार करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी "सकाळ'ला दिली.

मुंबई - कचऱ्यातील प्लास्टिकला किंमत मिळाली, तर हे प्लास्टिक नाल्यांमधून समुद्रात जाणार नाही, हे लक्षात घेऊन महापालिका प्लास्टिक खरेदीसाठी योजना तयार करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी "सकाळ'ला दिली.

प्लास्टिकची समस्या भीषण आहे. नालेसफाई करताना हे वास्तव समोर येते. समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका मारल्यानंतरही हीच परिस्थिती दिसते. प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यासाठी काही प्रयत्न करण्यात येत आहेत. टाकाऊ प्लास्टिकला मूल्य नसल्याने ते कचऱ्यात, नाल्यात टाकण्यात येते. नाल्यातून ते समुद्रात जात असल्याने समुद्र दूषित होतो. नालेही तुंबतात. सध्या प्लास्टिक एकत्र करण्याची प्रभावी यंत्रणा नाही. तशी यंत्रणा उभारावी लागेल. कचऱ्यात जाणाऱ्या प्लास्टिकला किंमत दिल्यास नागरिक ते कचऱ्यात टाकणार नाहीत. त्यासाठी योजना तयार करावी लागेल, असे आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले.

सध्या मोठ्या दुकानांमध्ये पातळ पिशव्या वापरल्या जात नाहीत. त्याऐवजी कागदी, कापडाच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. चैत्यभूमीवर फळवाटप करणारी एक व्यक्ती कागदी पिशवीतून फळे वाटत होती. हा बदल महत्त्वाचा आहे. त्याबद्दल त्या व्यक्तीचे कौतुकही केले, असेही आयुक्तांनी सांगितले. सध्या लहान दुकाने आणि फेरीवाले या पिशव्या वापरतात. या पिशव्या बंद करायच्या असतील, तर जनजागृती आवश्‍यक आहे.

कंपन्यांवर अंकुश हवा
पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणायची झाल्यास, त्या तयार करणाऱ्या कंपन्यांवर अंकुश ठेवावा लागेल. या कंपन्या घातक आहेत, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले.

Web Title: Considering the price of municipal plastic