कंत्राटी शिक्षकांचे भवितव्य टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नवी मुंबई  -  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठोक मानधनावरील 122 शिक्षकांना कामावरून कमी केल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन विनावेतन काम करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार यातील काही शिक्षकांनी महिनाभरापासून शाळेत शिकवायला सुरुवात केली; परंतु आता शिक्षण मंडळाने ठोक मानधनावर काम करण्यासाठी 161 शिक्षकांच्या भरतीची जाहिरात काढली आहे. त्यामुळे आपले काय होणार, असा प्रश्‍न या 122 शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

महापालिका शिक्षण मंडळाने तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर 196 प्राथमिक शिक्षक भरतीची जाहीरात 2010 मध्ये दिली होती. त्यानुसार तोंडी परीक्षा घेऊन सहा महिन्यांसाठी शिक्षकांची भरती झाली होती. पाच हजारांच्या मानधनावर त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे मानधन सात हजार झाले. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची मुदत संपल्यावर आयुक्त मुंढे यांनी या कर्मचाऱ्यांसोबतच 122 शिक्षकांची सेवा खंडित केली. अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याच्या सरकारच्या सूचनेमुळे ठोक मानधनावरील शिक्षकांची मुदत संपल्यानंतर त्यांना नवीन नियुक्तीपत्र दिले नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.

त्यानंतर यातील 72 शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन महापालिकेच्या कायम सेवेत सामावून घ्यावे आणि सीईटी होईपर्यंत नोकरीत ठेवावे, अशी मागणी केली होती. जोपर्यंत समायोजनाचे शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत विनावेतन काम करण्याची तयारी त्यांनी दाखविल्यावर न्यायालयाने त्यांना सेवेत ठेवण्याचे शिक्षण विभागाला आदेश दिले होते.

अतिरिक्त शिक्षकांचे काय?
ठोक मानधनावर शिक्षकांची भरती करण्याची जाहिरात पालिकेने काढली आहे. त्यानुसार हे 161 नवीन शिक्षक भरल्यावर अतिरिक्त शिक्षक झाल्यास त्याचे काय करणार, अशी विचारणा केल्यावर त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात 122 शिक्षकांची पुन्हा ठोक मानधनावर घेण्याची विनंती अमान्य केल्यावर त्यांनी फुकटात शिकविण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे मनपा ठोक मानधनावर दुसऱ्या शिक्षकांना घेणार असल्यामुळे 122 शिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Web Title: Contract teachers issue