पीएनजी वाहिनीचा कंत्राटदार काळ्या यादीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

या कंपनीला काळ्या यादीत टाकून महापालिकेने संबंधित दोन्ही कामांसाठी नव्या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.

मुंबई : जोगेश्वरीतील ओशिवरा हिंदू स्मशानभूमीच्या विद्युतवाहिनीचे रूपांतर पीएनजीवर अर्थात पाईप्ड नॅचरल गॅसवर केले जाणार आहे; ज्याचा फायदा पर्यावरणाला होणार आहे. मात्र हे काम अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदाराला शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीचे देखील काम देण्यात आले आहे. मात्र नेमणूक करण्यात आलेल्या या कंत्राटदार कंपनीने ओशिवरासह शिवाजी पार्कचेही काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकून महापालिकेने संबंधित दोन्ही कामांसाठी नव्या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.

महापालिकेच्या स्मशानभूमीतील विद्युतवाहिनींचे पाईप्ड नॅचरल गॅस आधारित ग्रीन स्मशानभूमीत रूपांतर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमी व जोगेश्वरी पश्‍चिम येथील ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत अस्तित्वात असलेल्या विद्युतवाहिनींचे पीएनजीवर रूपांतर करण्यासाठी महापालिकेने स्थायी समितीच्या मंजुरीनंतर मार्च 2016 मध्ये मेसर्स जे. अँड जे. हॉटमॅक्‍स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड केली होती. त्यानंतर या कंपनीने शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीतील विद्युतवाहिनींच्या कामालादेखील सुरुवात केली. परंतु हे काम पुढे अर्धवट सोडून देण्यात आले. त्यानंतर सातत्याने स्मरणपत्र देऊनही कंपनीने काम पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे या कंपनीला महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे.

त्यामुळे शिवाजी पार्कसह ओशिवरा स्मशानभूमीतील विद्युतवाहिन्यांचे कामदेखील रखडले आहे. आता पुन्हा नव्याने निविदा मागवून या कामांसाठी मेसर्स विचारे अँड कंपनीची निवड केली आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे; तर अर्धवट असलेल्या ओशिवरा स्मशानभूमीतील अर्धवट टाकलेले काम पुढे पूर्ण करण्यासाठीदेखील निविदा मागवण्यात आल्या आहेत. यासाठी 1 कोटी 14 लाख रुपयांचे कंत्राट मेसर्स अडोर वेल्डिंग लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे रखडलेले काम आता मार्गी लागेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contractor blacklist of PNG channel