स्थायी समितीत नाले"सफाई' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - नालेसफाईच्या कामासाठी कंत्राटदारांना आदेश देऊनही अजूनही परिस्थिती "जैसे थे'च आहे. पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांच्या अनेक भागांतील नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नाही. नालेसफाईच्या कामाला कंत्राटदार चुना लावत असल्याने अनेक नाले अजूनही गाळात रुतले असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सफाई कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे बुधवारी (ता. 30) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटण्याची दाट शक्‍यता आहे. 

आतापर्यंत 90 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी नाले गाळातच असल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंदाही मुंबईत पाणी तुंबण्याची भीती उपनगरातील नगरसेवक व्यक्त करीत आहेत. कंत्राटदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्यामुळे नालेसफाईची कामे होत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही नाले गाळातच असल्याने स्थायी समितीची बैठक वादळी ठरण्याची दाट शक्‍यता आहे. 

सत्ताधारी शिवसेनेनेही नालेसफाईचे काम समाधानकारक झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे पाणी तुंबलेच तर सहन करा, असे वादग्रस्त वक्तव्य खुद्द पर्जन्य जलवाहिन्यांच्या मुख्य अभियंत्यांनी केले आहे. विरोधी पक्षानेही नाले अद्याप कसे गाळात आहेत त्याची छायाचित्रेच सादर केली आहेत. काही ठिकाणी मेट्रोच्या कामांमुळे पडलेले खड्डे आणि पर्जन्य जलवाहिन्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे मुंबई तुंबलीच तर त्याला जबाबदार राज्य सरकार असेल, असे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी नालेसफाई पाहणी दौऱ्यानंतर म्हटले होते. 

दोन दिवसांत नालेसफाई कशी होणार? 
पालिका आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवून नालेसफाईबाबत आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. अनेक ठिकाणी नाले अद्याप गाळात आहेत. मग 31 मेपर्यंत म्हणजे दोन दिवसांत नालेसफाई कशी होणार, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. 

Web Title: Contractor for cleaning the drains