esakal | ठाण्यातील वादग्रस्त सायकल स्टॅंडचा प्रस्ताव रद्द! सत्ताधारी शिवसेनेचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील वादग्रस्त सायकल स्टॅंडचा प्रस्ताव रद्द! सत्ताधारी शिवसेनेचा निर्णय

ठाणे शहरात सायकल पुरविण्याच्या बदल्यात जाहिरातीचे हक्क देण्याचा ठेका सध्या वादग्रस्त ठरला आहे. या ठेकेदाराला अजून काही सुविधा देण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला होता.

ठाण्यातील वादग्रस्त सायकल स्टॅंडचा प्रस्ताव रद्द! सत्ताधारी शिवसेनेचा निर्णय

sakal_logo
By
राजेश मोरे

ठाणे ः ठाणे शहरात सायकल पुरविण्याच्या बदल्यात जाहिरातीचे हक्क देण्याचा ठेका सध्या वादग्रस्त ठरला आहे. या ठेकेदाराला अजून काही सुविधा देण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला होता. पण प्रस्तावात गोंधळ असल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रस्तावच रद्द करण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेकडून घेण्यात आला. 

हेही वाचा - ग्रामीण भागात 9 लाख घरकुले उभारण्याचा निर्धार; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

सायकल स्टॅंडचा प्रस्ताव यापूर्वी वेगळ्या ठेकेदाराच्या नावाने करण्यात आला आहे. मात्र आजच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा दुसऱ्याच कंपनीच्या नावाने प्रस्ताव आला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेच्या नगरसेविका रुचिता मोरे यांनी केला. त्यामुळे हा प्रकार कसा झाला, कोणाच्या चुकीमुळे झाला, याची चौकशी करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून ठेकेदाराकडून दंडाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर इतर नगरसेवकांनी देखील या वादग्रस्त प्रस्तावाला विरोध केल्याने अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रस्तावच रद्द करत असल्याचे जाहीर केले. 

ठाणे शहर स्मार्ट सिटी होणार असल्याची चर्चा घडवून, एका कंपनीला शहरातील महत्त्वाच्या 50 ठिकाणी स्टॅण्डसाठी मोफत जागा देण्यात आली. त्याचबरोबर खेवरा सर्कल येथील महापालिकेच्या इमारतीतील दोन मजले मोफत दिले. तसेच सायकल स्टॅण्डवर होणाऱ्या जाहिरातीसाठी पालिकेकडून कोणताही कर आकारला जात नाही. त्याबदल्यात या कंपनीने सुमारे अडीच वर्षांपूर्वी केवळ पाचशे सायकली दिल्या. या सायकलची किंमत केवळ 17 लाख 50 हजार रुपये होती. शहरातील महत्त्वाच्या व जाहिरातींच्या फलकाचे बक्कळ भाडे मिळणाऱ्या भागात कंत्रटदाराने सायकल स्टॅण्ड उभे केले आहेत. पालिकेने कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसल्यानंतरही, नागरिकांकडून भाडे आकारले जात होते. त्यामुळे ही योजना पूर्णपणो फसल्याचा आरोप होत होता. 

हेही वाचा - यंदा महापरिनिर्वाणदिनाचे थेट प्रक्षेपण; शिवाजी पार्कवर नागरी सुविधा नाही

त्यानंतरही ठेकेदाराला नव्याने ऊर्जा देण्यासाठी पुन्हा प्रस्तावात बदल करून महासभेच्या पटलावर आणण्यात आला होता. त्यानुसार यापूर्वी संबंधित ठेकेदाराला सायकल स्टॅण्डच्य शेल्टरवर जाहिरात करणे शक्‍य नसल्याने त्याला आता रस्ता दुभाजकावर 20 बाय 10 मोजमापाचे जाहिरात फलक उभारण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. 

दरम्यान यापूर्वी सायकल प्रकल्प राबविण्यासाठी "मीडिया पार्टनर' या ठेकेदारास जागा व जाहिरात अधिकार तसेच अटी-शर्ती यांना महासभेने मान्यता दिली होती. परंतु प्रत्यक्षात "साईनपोस्ट इंडिया प्रा. लि.' यांना ठेका देण्यात आला कसा, असा प्रश्न नगरसेविका रुचिता मोरे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी देखील यावर आक्षेप घेत, सायकल उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऍप डाऊनलोड केल्यानंतरही सायकल उपलब्ध होत नाही, केवळ ठेकेदाराला जाहिरातीच्या मोबदल्यात मलिदा लाटता यावा यासाठीच हा अट्टाहास करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच इतर सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. सायकल योजनाच पंक्‍चर झाली असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. एकूणच सदस्यांनी घेतलेला आक्षेप लक्षात घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रस्ताव रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. 

Controversial bicycle stand proposal in Thane canceled The decision of the ruling Shiv Sena

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image