‘बारवी’बाधित कोळे गावाचे बेटात रूपांतर  

मुरलीधर दळवी
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्‍यातील बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या कोळे गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. गावाला तिन्ही बाजूने बारवी धरणाचे पाण्याने वेढले आहे. तर चौथी बाजू जंगलाने वेढली असून, या मार्गावर दोन ओढे ओलांडावे लागतात. गावातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी ग्रामस्थांना बोटीवर अवलंबून रहावे लागत आहे.

मुरबाड : मुरबाड तालुक्‍यातील बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या कोळे गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. गावाला तिन्ही बाजूने बारवी धरणाचे पाण्याने वेढले आहे. तर चौथी बाजू जंगलाने वेढली असून, या मार्गावर दोन ओढे ओलांडावे लागतात. गावातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी ग्रामस्थांना बोटीवर अवलंबून रहावे लागत आहे.

बारवी धरण रस्त्यावरील पशेणी गावापुढे ३ किमी अंतरावर कोळे गाव वसलेले आहे. मुरबाडपासून हे अंतर केवळ ८ किमी असून येथे १५० घरे आहेत. तेथून शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरदार रोज होडीने प्रवास करत आपले इच्छित ठिकाण गाठतात. धरणाची उंची वाढल्यावर कोळे गावचा रस्ता पाण्यात बुडणार, हे अधिकाऱ्यांना माहीत होते. त्यामुळे हे गाव विस्थापित करण्यासाठी नागरिकांना घराच्या नुकसान भरपाईची रक्कम दिली. पण त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे एमआयडीसीने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी दोन होड्या दिल्या आहेत. 

मुख्य रस्त्यापासून वल्ह्याच्या साहाय्याने चालणाऱ्या रबरी होडीने खोल पाण्यातून गावात जायला एक किमी अंतरासाठी अर्धा तास लागतो. रात्रीच्या वेळी गावात कोणी आजारी पडले तर अंधारात या होडीतून त्याला मुरबाडला कसे आणायचे? हा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे. 

भातशेतीचे नुकसान
बारवी धरणाची उंची ७२.६० मीटर असली तरी प्रत्यक्षात ७३.१० मीटरपेक्षा जास्त पाणी धरणात साचले आहे. त्यामुळे परिसरातील भातशेतीचे नुकसान झाल्याचे बारवी धरण प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर व कार्याध्यक्ष चंद्रकांत बोष्टे यांनी सांगितले.

कोळे ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यासाठी मुरबाडमधील भूखंड शोधला होता. परंतु ग्रामस्थांची तेथे स्थलांतरित होण्याची इच्छा नाही. कोळे गावाजवळ खासगी भूखंड शोधून त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.
-प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conversion of kole gaon to island