मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोस्ट, ठाण्यातील अभियंत्याला बेदम मारहाण...

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 7 एप्रिल 2020

  • मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण 
  • समाजमाध्यमांवर विरोधात पोस्ट टाकल्याचा राग; तक्रार दाखल 

ठाणे : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात एका स्थापत्य अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत करमुसे (40) रा. उन्नतीवुडस, आनंदनगर, कासारवडवली असे मारहाण झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री आव्हाड यांच्या पोलीस शरीररक्षकांसह अन्य काही जणांनी अनंत यास राहत्या घरातून उचलून, ठाण्यातील बंगल्यावर नेत बेदम मारहाण केली.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात संचारबंदीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. 
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना रविवारी (ता.5) रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला मंत्री आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे विरोध व्यक्त केला होता. याविरोधात अनंत या ठाण्यातील अभियंत्याने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्याचाच राग मनात धरुन 5 एप्रिलच्या रात्री 11:50 च्या सुमारास दोन गणवेषातील व दोन साध्या वेशातील पोलिसांनी अनंतला बळजबरीने चारचाकीतून आव्हाड यांच्या विवियाना मॉलमागील नाथ बंगल्यावर नेले. या दोन्ही वाहनांमध्ये 10 ते 11 जण होते. अनंतने या प्रकाराबाबत विचारले असता, साहेबांच्या बंगल्यावर नेत असल्याचे संबंधितांनी सांगितले. त्या ठिकाणी गेल्यानंतर या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी स्वतः आव्हाड हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आपण त्यांची माफी मागितली. मात्र, तरीही मारहाणीनंतर फेसबुकवरील ती पोस्ट काढून टाकायला लावली. व नंतर ही पोस्ट चुकून पोस्ट केली. त्याबद्दल माफी मागतो. अशी चित्रफित माझ्याकडून बनवण्यात आली. अशी तक्रार या अभियंता तरुणाने वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

दरम्यान, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

अभियंत्याविरोधातही गुन्हा 

अभियंत्यास मारहाण प्रकरणाबाबत गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कॅबिनेट बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या अभियंत्याविरोधात देखील समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात तपशिलवार माहितीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस आयूक्त विवेक फणसळकर यांना संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

cops takes extreme step on the orders of jeetendra awahad allegation made by citizen of thane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cops takes extreme step on the orders of jeetendra awahad allegation made by citizen of thane