कोथिंबीर पुन्हा शंभरवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

भाज्यांची आवक निम्मीच; भाव कडाडले

मुंबई : कोथिंबिरीच्या जुडीने पुन्हा शंभरी गाठली आहे. आवक कमी असल्याने कोथिंबिरीच्या छोट्या जुडीसाठी तब्बल ५० रुपये मोजावे लागत आहेत. अवकाळी पाऊस पडून दोन आठवडे झाले, तरी मुंबईतील भाज्यांची आवक निम्म्याहून कमीच असल्यामुळे दर चढेच आहेत.

कोथिंबिरीच्या मोठ्या जुडीचा भाव घाऊक बाजारात ७० ते ८० रुपये, तर किरकोळ बाजारात १०० रुपयांवर आहे. छोटी जुडी ५० रुपयांना विकली जात आहे. अवकाळी पावसात तयार झालेली कोथिंबीर वाहून गेली. परिणामी आवक कमी झाल्यामुळे कोथिंबीर महागल्याचे दादर भाजीपाला मंडईतील विक्रेत्यांनी सांगितले. 

बाजारातील कांद्याची दैनंदिन आवक २०० ते २५० गाड्यांवरून ४० ते ५० गाड्यांवर आली आहे. दररोज १००० ते १२०० गाड्या भाजीपाल्याची आवक व्हायची. आता जेमतेम २०० ते २५० गाड्या येत आहेत, अशी माहिती भायखळा भाजी मंडईचे अध्यक्ष किशोर झोडगे यांनी दिली. 

आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव वाढले आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहील, अशी शक्‍यता भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली. पावसाचा सर्वाधिक फटका जमिनीखालील पिकांना बसला. त्यामुळे गाजर, बीट, सुरण आदींचे भाव कडाडले आहेत. गाजर ८० रुपये आणि बीट ४० ते ५० रुपये किलो असे दर आहेत.

भाज्यांचे भाव (प्रतिकिलो रुपये)

कांदा :    ४० ते ६०
फ्लॉवर :    ६० ते ७० 
कोबी :    ४०
ढोबळी मिरची :    ६०
भेंडी :    ६० ते ८०
टोमॅटो :    ४०
सुरण :    ६०
फरसबी :    १५० ते २००
तोंडली :    ६० ते ८०
मेथी (जुडी) :    ४० ते ५०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coriander price again 100 rupees