पोळी-भाजी केंद्रातून कोथिंबीर वडी गायब!

शर्मिला वाळुंज 
शनिवार, 6 जुलै 2019

कोथिंबिरीच्या वाढत्या किमतीमुळे खवय्यांना आपल्या जिभेला आवर घालावा लागत असून, पोळी-भाजी केंद्रातूनही कोथिंबीर वडी गायब झाल्याचे चित्र आहे.

ठाणे -  घाऊक बाजारात कोथिंबीर जुडीची किंमत ८० ते ९० रुपये असून किरकोळ बाजारात २०० रुपये जुडीमागे मोजावे लागत आहेत. कोथिंबिरीच्या वाढत्या किमतीमुळे खवय्यांना आपल्या जिभेला आवर घालावा लागत असून, पोळी-भाजी केंद्रातूनही कोथिंबीर वडी गायब झाल्याचे चित्र आहे.

पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात आलेल्या थंडाव्याने खवय्यांना गरमागरम भजी खावी, असे वाटते. त्याबरोबरच खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वड्याही खाण्याची इच्छा होते. परंतु किरकोळ बाजारातील कोथिंबिरीच्या जुडीची किंमत पाहून ग्राहक चाट पडत आहेत. 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीच्या जुडीची किंमत ही ८० ते ९० रुपयांच्या घरात आहे; तर याच जुडीचा दर ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील किरकोळ बाजारात २०० रुपये आहे. दहा रुपयांची कोथिंबीर मागायला ग्राहक जाताच त्यांना १० रुपयांत कोथिंबीर येत नाही, असे सरळ उत्तर त्यांना दिले जाते. एरव्ही १० रुपयांना मिळणाऱ्या लहान जुडीसाठी ग्राहकांना सध्या ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यातही अर्धी कोथिंबीर पावसाने खराब झालेली असते. हे पाहता खवय्यांनी आपल्या जिभेला आवर घातला आहे.

पावसाचा जोर वाढल्यापासून पालेभाज्या महाग झाल्या आहेत. कोथिंबीर घाऊक बाजारात १०० रुपये जुडी आहे. बाजारात माल आला तरी पावसामुळे भाज्या लवकर खराब होतात. पावसामुळे खमंग कोथिंबीर वड्या, धपाटे यांची मागणी वाढते. परंतु आठवड्यातून एक दिवस असा मेनू ठेवतो. दररोज ग्राहकांसाठी हे पदार्थ बनविले जात नाहीत. 
- प्रवीण साटम, स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र 

शहरातील मोठ मोठ्या स्नॅक्‍स कॉर्नरवर दररोज कोथिंबीरीच्या वड्या २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्रीस असतात. दररोजचा खप असल्याने भाववाढीचा फटका बसत नाही. 
- संदीप लाखन, प्रशांत कॉर्नर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coriander wadi disappeared from Meals