मुंबईतल्या 'जी उत्तर' मध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक, रूग्णसंख्या पुन्हा वाढतेय

मुंबईतल्या 'जी उत्तर' मध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक, रूग्णसंख्या पुन्हा वाढतेय

मुंबईः   कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकंवर काढलेलं दिसत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं विविध पातळीवर प्रयत्न केले. मात्र पुन्हा शहरात कोरोनाबाधिताचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यात मुंबईतल्या जी उत्तर वॉर्डमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. या वॉर्डमध्ये एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीचा समावेश आहे. तसंच धारावीव्यतिरिक्त माहिम आणि दादर भागाचाही समावेश यात येतो. 

दरम्यान आता एकेरी अंकावर आलेली जी उत्तरमधील रूग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.  जी उत्तरमध्ये रविवारी 24 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये काल दिवसभरात 6 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3,646 इतकी झाली आहे. तर 18 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दादरमध्ये काल केवळ 7 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,494 इतकी झाली आहे. तर 117 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये ही काल केवळ 11 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,262 इतकी झाली आहे. तर 249 एक्टीव्ह रूग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात रविवारी  24 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12,402 वर पोहोचला आहे.  384 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 626 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,317, दादरमध्ये 4,207 तर माहीममध्ये 3,871 असे एकूण 11,395 रुग्ण कोरोनामुक्त झालेत.

मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच

शहरात कोरोनाबाधिताचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. रविवारी 1,135 नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,75,707 झाली आहे.   काल 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,673 वर पोहोचला आहे. रविवारी 618 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,52,127 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे.  मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 258 दिवसांवर गेला आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत एकूण 17,73,989 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.27 इतका आहे.

मुंबईत रविवारी नोंद झालेल्या 19 मृत्यूंपैकी 18 जणांना दीर्घकालीन आजार होते. रविवारच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 12 पुरुष तर 7  महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 3 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते तर 14 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona condition Mumbai G North alarming number of patients rising again

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com