कोरोनानं घातला खो ! आधी गुडीपाडवा मग अक्षय तृतीया, गृहप्रवेशाचा मुहूर्त चुकला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

आयुष्यभराची पुंजी गुंतवून घराचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. हे स्वप्न साकार झाले, नवीन घराचा ताबाही मिळाला, पूजेचा मुहूर्त ठरवून आमंत्रणही धाडले गेले....पण कोरोनाने यात खो घातला

ठाणे : आयुष्यभराची पुंजी गुंतवून घराचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. हे स्वप्न साकार झाले, नवीन घराचा ताबाही मिळाला, पूजेचा मुहूर्त ठरवून आमंत्रणही धाडले गेले....पण कोरोनाने यात खो घातला....गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकला. आता अक्षय तृतीयाआधी लॉकडाऊन उठेल आणि नव्या घरात रहायला जाऊ अशी स्वप्न काही जण पाहत होते. परंतू अक्षयतृतीयेचा सणही लॉकडाऊनमध्येच साजरा करावा लागणार असल्याने हाही मुहूर्त चुकला आहे.

हे ही वाचा अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करायचंय, आहो अशी करा ना मग सोनं खरेदी...

वैशाख महिन्यात शुल्क पक्षात येणारा अक्षय तृतीया सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवसाला अन्ययसाधारण महत्त्व आहे. या मुहूर्तावर नवीन व्यवसाय, नवीन खरेदी, नवे घर, वाहन, सोने खरेदी, गृहप्रवेश अशा अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला. त्यामुळे सर्व जनजीवन, व्यवहार ठप्प झाले आहेत. 

नक्की वाचा आता विनाकारण घराबाहेर फिराल तर हवेत उडणारे पोलिस लागतील मागे...

आम्ही ठाण्यात घर घेतले आहे. गुढीपाडव्याला घराचा ताबा मिळणार होता, त्यामुळे ताबा मिळताच गृहप्रवेशाची तयारी केली होती. परंतू लॉकडाऊन जाहीर झाल्याने ना घराचा ताबा मिळाला ना नवीन घरात प्रवेश करु शकलो. अक्षय तृतीयेचा मुहूर्तही गेल्याने गणेशोत्सवानंतरच नवीन घरात प्रवेश करण्याचा विचार आहे.
- सुखविंदर सिंग, डोंबिवली

घराचा ताबा मिळाला असून नविन घरात फर्निचर व इतर सामान बनविण्याचे काम सुरु आहे. अक्षय तृतीयेला पूजा करुन नविन घरात प्रवेश करणार होतो. आता लॉकडाऊननंतरच एखादा चांगला दिवस पाहून गणेशपूजन करुन रहायला जाऊ. दिवाळीनंतरच घराची पूजा करण्याचा विचार आहे. 
- नीता चव्हाण, डोंबिवली

आम्ही भाड्याने राहात आहोत. मार्चमध्ये करार संपत होता. नवीन घर डोंबिवलीत घेतले असून मार्चमध्ये तेथे राहायला जाणार होतो. मात्र लॉकडाऊन अचानक जाहीर झाल्याने राहायला जात आले नाही. एप्रिलमधील अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्याचा विचार होता. पूजेची सर्व तयारी झाली आहे. नातेवाईकांना आमंत्रणही धाडले होते. 
-पल्लवी माने, डोंबिवली

 

corona effect, First Gudipadva, then Akshay Tritiya, missed gruhapravesh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect, First Gudipadva, then Akshay Tritiya, missed gruhapravesh