esakal | कोरोना इफेक्ट! यंदा गणेशोत्सवात पोलिस राहणार तणावमुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra_police_

संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवच रद्द केल्याने आणि बाप्पाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांवरही प्रशासनाने रोक लावल्याने यंदा रक्षकांना उसंत मिळाली आहे.

कोरोना इफेक्ट! यंदा गणेशोत्सवात पोलिस राहणार तणावमुक्त

sakal_logo
By
दीपक शेलार

ठाणे ः कोरोनाने सगळ्याच सणासुदीच्या आनंदावर विरजण पडले असून उत्सवाची रंगतच हरवून गेली आहे. कोरोनाच्या सावटाखाली गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव पार पडत आहे. तेव्हा, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवच रद्द केल्याने आणि बाप्पाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांवरही प्रशासनाने रोक लावल्याने यंदा  पोलिसांना उसंत मिळाली आहे. शिवाय, अतिरिक्त फौजफाट्याला विराम मिळाला असल्याने यंदा पोलिसांवरील गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताचा ताण काहीसा हलका झाला आहे; मात्र गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आलेल्या मोहरम सणामुळे भिवंडी, मुंब्रा आणि राबोडीसारख्या संवेदनशील भागात पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यानुसार ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सुमारे चार हजार पोलिस बंदोबस्तावर तैनात ठेवले आहेत.

हेही वाचा : कोरोनाग्रस्त पित्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच मुलानेही सोडला प्राण; नवीन पनवेलमधील घटनेने हळहळ

 
दरवर्षी गणेशोत्सवात पोलिसांना बंदोबस्तासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागत असतो. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात दरवर्षी एक हजार 60 च्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सवांची धामधूम असते; तर हजारोंच्या घरात घरगुती गणपती असतात. त्यामुळे बाप्पाचे आगमन आणि विसर्जनावेळी शहरांत चोख बंदोबस्त ठेवावा लागतो;

मोठी बातमी : सीबीआयच्या पथकाला क्वारंटाईनमध्ून सूट मिळण्याची शक्यता? वाचा सविस्तर 

मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने सरकारने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. किंबहुना गृहसंकुलात कृत्रिम हौद व घरच्या घरी विसर्जनाचा पर्याय दिला आहे. त्यामुळे विसर्जन घाटावरील देखरेखीपासून पोलिसांना उसंत मिळणार आहे. अनेकांनी तर यंदा दीड दिवसच गणपती ठेवण्याचे ठरवल्याने पाच किंवा 10 दिवसांच्या गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या पोलिस बंदोबस्तावरील भार काहीसा हलका झाला आहे. 

 4 हजार पोलिस तैनात 
गणेश आगमन आणि विसर्जनात मिरवणुका नसल्या, तरी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची देखरेख असणार आहे. त्यानुसार ठाणे पोलिस आयुक्तालयातील विविध 35 पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे चार हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 

( संपादन ः रोशन मोरे)


Corona effect ON Ganeshotsav reduces the stress of police duty

loading image
go to top