
Corona News : CM शिंदेंच्या ठाण्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, किती आहे संख्या?
Corona News : एकीकडे साथीच्या आजारांनी डोके वर काढलेले असताना दुसरीकडे कोरोना पुन्हा डोकावू पाहत आहे. मागील तीन महिन्यांचा विचार करता, ठाण्यात महिन्याकाठी ३० ते ४० कोरोना रुग्णांची नोंद होत होती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाण्यात एका महिन्यात ५१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे महापालिका प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.
पावसाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे साथीचे आजार उद्भवतात. गेल्या काही महिन्यांत ठाण्यात मलेरिया, डेंगी, लेप्टो आदींसह इतर साथ आजारांच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे.
या महिन्याच्या एका आठवड्यात ठाण्यात ५१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये त्या आजाराची दाहकता कमी झालेली आहे. या नव्या ५१ रुग्णांपैकी ४ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात एका दहा महिन्यांच्या मुलीचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, मागील तीन महिन्यांत दर महिना साधारपणे ४० ते ४५ रुग्ण आढळून येत होते. दर दिवशी ३५० च्या आसपास कोरोनाच्या चाचण्या केल्या जात होत्या. शनिवारपासूनच कोरोना चाचण्यांची संख्या ही ३५० वरून ७०० केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
रुग्णसंख्या वाढत असली तरी घाबरण्याचे कारण नाही. नव्याने रुग्ण आढळले आहेत. त्यातील ४ रुग्ण हे रुग्णालयात दाखल होते, तर उर्वरित रुग्णांवर घरीच उपचार झालेले आहेत; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे.
- संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठामपा.