या शहरात कोरोनाच्या चाचण्या धीम्यागतीने

अर्चना राणे-बागवान : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नवी मुंबई शहरातील काही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. असे असताना शहरातील कोरोनाच्या चाचण्या मात्र धीम्यागतीने सुरू आहेत. 

नवी मुंबई (बातमीदार) : दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नवी मुंबई शहरातील काही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. असे असताना शहरातील कोरोनाच्या चाचण्या मात्र धीम्यागतीने सुरू आहेत. 

नवी मुंबईत पहिला कोरोना रुग्ण सापडल्याच्या घटनेला आता महिना होत आला आहे; मात्र पालिकेने आतापर्यंत केवळ 400 जणांचीच चाचणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून विविध आरोग्यतज्ज्ञांनी जास्तीत जास्त चाचण्या घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालिका मात्र अजूनही बाधितांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध घेण्यालाच प्राधान्य देत आहे. 

धक्कादायक! डहाणूतील ३ वर्षांच्या चिमुरडीला कोरोना, २४ जण विलगीकरणात

पालिका क्षेत्राची लोकसंख्या जवळपास 15 लाखांच्या आसपास आहे. शहरात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून दररोज वेगवेगळ्या भागांत रुग्ण वाढत आहेत. सुरुवातीला वाशी येथे रुग्ण आढळल्यानंतर हळूहळू ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ, बेलापूर या भागांतही रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. 

सोमवारी एकाच दिवसात शहरात 11 नवीन रुग्णांची नोंद होऊन एकूण रुग्णसंख्या 50 वर पोहोचली. त्यापैकी सहा जण बेलापूर येथील एकाच कुटुंबातील आहेत. या रुग्णांचे अहवाल आधी आले असते, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणीही लवकर झाली असती, असे मत आता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. 

हे ही वाचा... लॉकडाऊननंतर या व्यवसायाला अच्छे दिन....

1300 जण होम क्वारंटाईन 
नवी मुंबई महापालिकेने सोमवारी सायंकाळपर्यंत 376 नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे. शहरात क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची एकूण संख्या 1 हजार 250 पेक्षाही जास्त आहे. क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची आरोग्यविषयक माहिती सात आणि 14 दिवसांनंतर पालिकेमार्फत घेतली जाते. मात्र, कोविडची लक्षणे आढळली, तरच पुढे त्यांची चाचणी केली जाते. पालिकेने या सर्वांची कोरोना चाचणी करणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

कर्जतमध्ये गवती चहाचा दरवळ!...  वाचा कसे ?

चाचण्यांचे प्रमाण कमी 
एकूण चाचण्यांचा विचार करता महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण दिल्लीत अधिक आहे. दिल्लीत दर 10 हजार लोकसंख्येमागे सात चाचण्या केल्या आहेत. तर महाराष्ट्रात हे प्रमाण 2.8 इतकेच आहे. नवी मुंबईतील लोकसंख्येचा विचार करता दर 10 हजार लोकसंख्येमागे पालिकेने केवळ 2.5 चाचण्या केल्याचे दिसून येत आहे. 

अनावश्‍यक चाचण्या करू नयेत, अशा सरकारच्या सूचना आहेत. चाचण्या वाढवल्यास टेस्टिंग लॅबवरील भार वाढू शकतो. आपण हाय रिस्क आणि लो रिस्क अशी वर्गवारी केली आहे. हाय रिस्कमधील म्हणजे जे रुग्णाच्या थेट संपर्कात असतील, त्यांची चाचणी करत आहोत. बाकीच्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. पालिकेमार्फत त्यांच्या दर 14 दिवसांनी तपासण्या होत आहेत. 
- डॉ. अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test speed in slow motion at Navi Mumbai