Corona update : दिवाळीच्या तोंडावर आढळला कोरोनाचा नवा व्हेरीयंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates News

Corona update : दिवाळीच्या तोंडावर आढळला कोरोनाचा नवा व्हेरीयंट

मुंबई : कोविड संसर्गाचा ओमिक्रॉनचा नवीन अधिक संसर्गजन्य उपप्रकार आढळला आहे. दीपावली सारख्या सण उत्सवाच्या कालावधीत अधिक संख्येने होणाऱ्या भेटीगाठी, कार्यक्रम लक्षात घेता नागरिकांनी संसर्ग प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अहवालामध्ये ओमिक्रोन विषाणूचे नवीन उपप्रकार आढळून आले आहेत. हे नवीन उपप्रकारांचे जुन्या ओमिक्रॉनच्या उपप्रकारांपेक्षा अधिक प्रमाणात संसर्गजन्य ठरू शकतात. ऑक्टोबर २०२२ च्या दुसऱया आठवड्यात कोविड – १९ च्या रुग्णांची वाढलेली संख्या आणि जवळ आलेला सणांचा हंगाम लक्षात घेता, नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण मोठ्या सणासुदीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येतात. कार्यक्रम, सोहळे, भेटीगाठी, मेळावे, जत्रा यासह बंदिस्त आणि हवेशीर नसलेल्या ठिकाणी देखील नागरिक एकत्र आल्यानंतर कोविड सुरक्षित वर्तनाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.

अशा स्थितीत कोविड संसर्गाचा फैलाव होवू नये यादृष्टीने पालिकने  काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. 

• सणासुदीच्या काळात कोविड – १९ प्रतिबंध करण्यास योग्य ठरेल, असे वर्तन राखणे महत्त्वाचे आहे.

• ज्या नागरिकांनी अद्यापही कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल, त्यांना (बूस्टर डोस) घेणे आवश्यक आहे 

• घरामध्ये हवा खेळती ठेवा

• लक्षणे असलेल्या रुग्णांशी नजीकचा संपर्क टाळावा

• वारंवार हात स्वच्छ धुवा.

• शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल / टिश्यू पेपरचा वापर करा.

• संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी (मास्क) घालणे आवश्यक आहे.

• लक्षणे दिसू लागताच कोविडची चाचणी करुन घेणे अतिशय गरजेचे आहे. 

• श्वास घेण्यास त्रास होणारे रुग्ण तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले रूग्ण आणि ज्यांनी कोरोना संसर्ग प्रचलित असलेल्या देशांना नुकतीच भेट दिली आहे, अशा प्रकारच्या  रुग्णांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.