पोस्ट कोविडमध्ये वाढले नेत्रविकार, अशी घ्या काळजी आणि उपचार

भाग्यश्री भुवड
Sunday, 17 January 2021

कोरोनातून बरे झाल्यानंतरही लोकांना डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत. पालिकेच्या नायर रुग्णालयात नेत्र विकारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. 

मुंबई: डोळे हा शरीराचा नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. मात्र, कोरोनातून बरे झाल्यानंतरही लोकांना डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत. पालिकेच्या नायर रुग्णालयात नेत्र विकारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. 

त्यात डोळ्यांना सतत खाज सुटणे, डोळ्यांत सूज येणे, डोळ्यांच्या नसांना सूज येणे असे आजार वाढीस लागले आहेत असे नायर रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉ. सरोज सहदेव यांनी सांगितले. 

कोविड काळात ज्यांना आधीपासूनच डोळ्यांचे आजार होते. त्यांच्या समस्या अधिक बळावल्या. मोतिबिंदू, पडदा सरकणे अशा समस्या जास्त वाढल्या. पण, आता रुग्णालये सुरु झाल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्यांना कधीच डोळ्यांचा आजार नव्हता अशा लोकांमध्ये डोळ्यांतील रेटिनाच्या रक्तवाहिनीत गुठळ्या होऊन त्या बंद होऊन दृष्टी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत असे चार ते पाच रुग्ण नायर रुग्णालयात उपचारांसाठी आले होते. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्या रुग्णांनी वेळेत येऊन उपचार घेतले त्यांचे आजार कमी झाले मात्र, ज्यांच्या आजाराने जोर धरला होता त्यांच्या आजारांना बरे होण्यासाठी वेळ लागला. 

हेही वाचा- TRP Case: बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांची प्रकृती गंभीर

नायर रुग्णालयात जवळपास दिवसाला किमान

250 रुग्ण नेत्र विकारांच्या उपचारांसाठी दाखल होतात. त्यापैकी कमीत कमी 1 ते 2 टक्के लोकांच्या पोस्ट कोविड मध्ये डोळ्यांच्या रक्तवाहिनीत गुठळ्या झाल्याचे आढळून आले आहेत. 
डॉ. सरोज सहदेव, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, नेत्रशल्यचिकित्सा विभाग

ही लक्षणे
नसांमध्ये सूज येते, डोळा सुजणे, पू जमा होणे, संसर्ग होणे, कोरडेपणा येतो.

उपचार

अशा रुग्णामध्ये शस्त्रक्रिया कराव्या लागतात.
रक्तवाहिनीतील गुठळ्यांमध्ये रक्त पातळ करण्याचे औषध दिले जाते. 
डोळ्यांत इंजेक्शन ही दिले जातेय. 
सूज कमी होण्यासाठी उपचार केले जातात. 

जास्त सॅनिटायझर वापरले तर त्याचा ही परिणाम होऊ शकतो. सॅनिटायझरचा हात जर डोळ्यांना लावला तर खाज सुटणे, किंवा डोळे लाल होणे अशा तक्रारी उद्भवतात. काही सॅनिटायझरमध्ये मिथेल अल्कोहल असते. शिवाय, एका रिपोर्टनुसार, ज्या नसीद्वारे आपल्याला दिसतं त्या नसीवर परिणाम झाला. त्यामुळे साबण आणि पाण्याने हात धुणे पुरेसे असल्याचे ही डॉ. सहदेव यांनी सांगितले. 

डोळ्याच्या आतील भागात मोतिबिंदूनंतर एक व्हिटरस नावाचा पाण्याचा थर (फ्लूड) असतो. ज्याला व्हिटरस हॅमरेज होतो. त्यातूनही दृष्टी कमी होते. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हर्पिस झोस्टर नावाचा संसर्ग ही लोकांना कोविड सोबत झाला आहे. ज्याच्यात डोळे आणि चेहऱ्यावरील  त्वचेवर परिणाम होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे डॉ.सहदेव यांनी सांगितले.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Virus Increased Ophthalmology in post covid 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Increased Ophthalmology in post covid