कोरोनाचा 'आरटीओ'लाही फटका; पाच महिन्यांत महसुलात मोठी घट

राहुल क्षीरसागर
Tuesday, 4 August 2020

टाळेबंदीचा सामना सर्वसामान्य नागरिकांपासून विविध उद्योगधंदे, व्यापाऱ्यांना करावा लागत आहे. आता या आजाराचा फटका ठाणे प्रादेशिक परिवहन विभागालादेखील बसला आहे.

ठाणे : टाळेबंदीचा सामना सर्वसामान्य नागरिकांपासून विविध उद्योगधंदे, व्यापाऱ्यांना करावा लागत आहे. आता या आजाराचा फटका ठाणे प्रादेशिक परिवहन विभागालादेखील बसला आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कोरोनामुळे वाहन विक्री मंदावल्याने त्याचा परिणाम प्रादेशिक परिवहन विभागाच्या उत्पन्नावर झाला असून, मागील वर्षीच्या मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीतील महसुलाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी केवळ 35 टक्केच महसूल जमा झाला आहे. त्यामुळे नवीन वाहन नोंदणी आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या करावर मोठा परिणाम झाल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.

घोडबंदरमध्ये मुसळधार पावसानं घेतला पहिला बळी, ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तीन ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. दरवर्षी जिल्ह्यात खरेदी करण्यात येणाऱ्या वाहन खरेदीच्या माध्यमातून मोठा महसूल प्रादेशिक परिवहन विभागाला मिळत असतो. या वाहन विक्रीच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन विभागाला रस्ते कर, पर्यावरण कर, वाहननोंदणी कर, परवाना नूतनीकरण कर, परमीट कर अशा विविध करांच्या स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. जानेवारी ते जुलै या कालावधीत बस, जड-अवजड वाहने आणि चारचाकी गाड्यांची खरेदी-विक्री होते. त्यामुळे या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तीन उपप्रादेशिक कार्यालयांमधून 250 कोटींहून अधिक महसूल मिळतो. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन विक्रीत कमालीची घट झाली असून, त्याचा परिणाम महसुलावर झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या तुलनेत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत यंदा केवळ 35 टक्केच महसूल जमा झाला आहे. 

पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प; अतिवृष्टीमुळे मंकी हिल रुळावर दरड कोसळली...

दरम्यान, जिल्ह्यातील ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या वर्षी मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत 188 कोटी 80 लाख 94 हजार 314 रुपये इतका महसूल जमा झाला होत. यंदाच्या वर्षी अवघा 67 कोटी सात लाख 97 हजार 318 रुपये इतका झाला आहे. तर, नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात याच कालावधीत गेल्या वर्षी 93 कोटी 25 लाख सहा हजार 84 रुपये इतका महसूल जमा झाला होता. यंदा केवळ 35 कोटी 69 लाख 27 हजार 116 रुपये इतका जमा झाला आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही या काळात 81 कोटी 60 लाख 36 हजार 646 इतका महसूल तर यंदा केवळ 30 कोटी पाच लाख 40 हजार 910 इतका महसूल प्राप्त झाला आहे.

 

सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांमधील आत्मविश्वास कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांचा वाहन खरेदीकडे कल कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाला कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झालेली दिसून येत आहे.
- रवी गायकवाड, प्रादेशिक परिवहन विभागप्रमुख, ठाणे

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's 'RTO' also hit; drop in revenue in five months