महापालिका आयुक्तांचा सर्वपक्षीय वाढदिवस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

अभिनय कट्ट्यावर शनिवारी आयुक्तांचा वाढदिवस अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. दिव्यांग मुलांनी आपल्या अदाकारीने आयुक्तांच्या वाढदिवसाला चारचॉंद लावले. या वेळी आयुक्तांचे डोळेदेखील पाणावले. त्यामुळे आयुक्तांनी त्यांना 51 हजारांचे बक्षीस आणि चॉकेलेट दिले.

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे सख्य नसल्याचे चित्र रंगविले जात आहे. पण हे चित्र धूसर झाल्याचे दिसत असून शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात जयस्वाल यांचा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. महापालिकेत एखाद्या आयुक्तांचा अशाप्रकारे सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीरपणे पहिल्यांदाच वाढदिवस साजरा केला आहे. 

या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, उपमहापौर रमाकांत पाटील, रायगड जिल्हा संप्रर्कप्रमुख संजय मोरे, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. 

सकाळपासूनच आयुक्तांसाठी विविध ठिकाणी वाढदिवसाचे कार्यक्रम करण्यात आले. यामध्ये नौपाडा विभागासह आचार्य अभिनय कट्टा आदी ठिकाणी त्यांच्या हस्ते केक कापण्यात आले. तसेच पोखरण रोड क्रमांक एक येथे ओपन आर्ट गॅलरीचे उद्‌घाटन करण्यात आले. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, महापालिकेच्या उत्पन्नात वाढ, महापालिकेचा डीपी प्लॅन अमलात आणण्यात पुढाकार आदी कामांमुळे आयुक्तांनी शहराच्या विकासात योगदान दिलेले आहे. अशावेळी काही राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीकाही केली. पण आजच्या घडीला त्यांचा एकत्रित सत्कार करून आयुक्तांच्या कामाला पोचपावती दिली. 

अभिनय कट्ट्यावर वाढदिवस साजरा 

अभिनय कट्ट्यावर शनिवारी आयुक्तांचा वाढदिवस अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. दिव्यांग मुलांनी आपल्या अदाकारीने आयुक्तांच्या वाढदिवसाला चारचॉंद लावले. या वेळी आयुक्तांचे डोळेदेखील पाणावले. त्यामुळे आयुक्तांनी त्यांना 51 हजारांचे बक्षीस आणि चॉकेलेट दिले.

तसेच या दिव्यांगांच्या संस्थेला प्रत्येक वर्षी 50 लाखांचा निधी देण्याची घोषणाही आयुक्तांनी केल्याचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सांगितले. तसेच जिद्द शाळा, सिग्नल शाळा येथे देखील आयुक्तांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. उथळसर भागातील जोगीला तलावाला नवसंजीवनी देण्याच्या कामाचा शुभारंभ आयुक्तांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. 
 

Web Title: Corporation Commissioner Birthday Celebration