प्रशासनाच्या वेळकाढूपणाने नगरसेवकांना अभय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018


चुकीच्या कागदपत्रांबद्दल फसवणुकीचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करून ते प्रकरण जिल्हा न्यायालयांत पुढील आठवड्यात देण्यात येणार आहे. तसेच इतर नगरसेवकांच्या प्रकरणाबाबत काही तक्रारदारांचे जाबजबाब झाले आहेत. इतर तक्रारदार व संबंधित नगरसेवकांचे जाबजबाब घेण्याला गती देऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल. 
- मनोहर हिरे, आयुक्त, भिवंडी महानगरपालिका 

भिवंडी : भिवंडी शहर महानगरपालिकेच्या गतवर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या काही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रनुसार राज्य निवडणूक आयोगास विहित कालावधीत आपली कागदपत्रे सादर केली नाहीत; तसेच काहींनी चुकीची कामे केली आहेत, अशा 18 नगरसेवकांविरोधात कोकण आयुक्त व राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. 

गेल्या वर्षापासून या तक्रारींची सुनावणी करण्यास प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने तक्रारदार व नागरिकांत संताप व्यक्त केला जात असून या नगरसेवकांना अभय मिळाल्याने पालिकेच्या कामकाजात ते सहभागी होत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून आयुक्त मनोहर हिरे यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी वाढू लागली आहे. 

भिवंडी महानगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 45 प्रभागांतूून 90 नगरसेवक निवडून आले. त्यापैकी काही नगरसेवकांनी निवडणूकीपूर्वी राज्य निवडणूक विभागास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली होती; तर काही उमेदवारांनी अपुरी कागदपत्रे निवडणूक विभागास देऊन उरलेली कागदपत्रे निवडणुकीनंतर सहा महिन्यांत सादर करण्याची प्रतिज्ञापत्रे दिली होती.

मात्र या घटनेस वर्ष उलटूनही सदरची कागदपत्रे सादर केली नसल्याचे पालिका सूत्रूकडून समजते. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केवळ 9 नगरसेवकांची सुनावणी करीत हा विषय प्रलंबित ठेवला आहे. सदर 18 नगरसेवकांमध्ये कॉंग्रेस, भाजप, कोणार्क विकास आघाडी अशा विविध पक्षाच्या नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल आहेत. 

Web Title: Corporators absence from time to time for administration