नगरसेवकांना भीती मुंबई बुडण्याची! 

Corporators fear dump Mumbai
Corporators fear dump Mumbai

मुंबई - नालेसफाईच्या कामाकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत यंदाही मुंबई बुडणारच, अशी भीती सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी (ता. 8) महासभेत व्यक्त केली. नालेसफाई मेअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. सखल भागात पाणी तुंबेल; पण त्याचा निचरा वेगाने करण्याचा प्रयत्न आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आज महासभेत नालेसफाईचा मुद्दा उपस्थित केला. एप्रिल महिन्यात काम पूर्ण होऊनही नालेसफाई अद्याप समाधानकारक नाही, असा आरोप त्यांनी केला. मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना त्रास होणार असल्याची भीती पालिका आयुक्त अजोय मेहता व्यक्त करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढवला. पावसाळा जवळ आला की नालेसफाईवर चर्चा होते; पण मुंबईकरांना त्रास सहन करावाच लागतो, असे मत भाजपच्या प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केले. यंदा सफाईचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ उपसणे अशक्‍य आहे, असा मुद्दा सर्वपक्षीय नगरसेवकांनी मांडला. पावसाळ्यापूर्वी 60 टक्के आणि उर्वरित वर्षभरात 40 टक्के नालेसफाई केली जाते, असा दावा प्रशासन करते; मात्र प्रत्यक्षात 40 टक्केही नालेसफाई होताना दिसत नाही, असा आरोप शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी केला. 

नालेसफाईची कामे वेगाने सुरू असून, पालिका आयुक्त स्वत: रेल्वे प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले. मुंबईत काही सखल भाग असून, तिथे पाणी तुंबणारच; पण त्याचा त्वरित निचरा करण्यासाठी पालिकेने पंप बसवले असल्याचेही सिंघल यांनी सांगितले. 

चौकशीची मागणी 
शिवसेना व भाजपचे नेते नालेसफाई आणि नद्यांच्या पाहणीचे फक्त फोटो काढून चमकतात; पण नदी व नाल्यांची स्थिती काही बदलत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे कप्तान मलिक यांनी लगावला. फसवी आकडेवारी दाखवून कागडी घोडे नाचवू नका, असे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाला सुनावले. नालेसफाईला विलंब झाल्याने चौकशी करावी, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. 

चिखलफेक 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पाणी तुंबण्याची शक्‍यता वर्तवली आहे. त्यांनी त्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यावर ढकलली. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्याचे त्यातून स्पष्ट होते. त्यावर यशवंत जाधव यांनी कॉंग्रेसला सुनावले. ते म्हणाले, की उद्धव ठाकरे असे नेते आहेत की ते स्वत: नालेसफाईच्या कामाची पाहणी करतात. नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असतील, तर ती प्रशासनाची जबाबदारी आहे. केवळ सत्ताधारी म्हणून शिवसेनेचीच नाही. नगरसेवक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. आम्ही काय करावे आणि काय करू नये, हे कॉंग्रेसने सांगण्याची गरज नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com