स्मशानभूमीसाठीच्या लाकडातही भ्रष्टाचार!

स्मशानभूमीसाठीच्या लाकडातही भ्रष्टाचार!
स्मशानभूमीसाठीच्या लाकडातही भ्रष्टाचार!

मुंबई : महापालिकेचा कंत्राटदार मृताच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत लाकडे पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडून घोळ होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. महापालिका प्रशासनाने त्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन कारवाईस सुरुवात केली आहे. या संदर्भात कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. 

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील स्मशानभूमींमध्ये येणाऱ्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ३०० किलो सुक्‍या लाकडांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाकडे प्रत्येक स्मशानभूमीला पुरवली जातात. परंतु, कंत्राटदारांकडून महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असून, या पुरवठ्यात घोळ होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गलगली यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मुलुंड ‘टी’ वॉर्डातील कंत्राटदार के. व्ही. परुळेकर यांना महापालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुलुंड पश्‍चिम डम्पिंग ग्राऊंडजवळील स्मशानभूमीत ओल्या आणि कमी दर्जाच्या लाकडांचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार केली होती. येथील सहायक आयुक्त के. बी. गांधी यांनी तत्काळ तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र शिंगाणपूरकर यांनी संबंधित कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून हलगर्जीपणा केल्याबद्दल आपणास का जबाबदार धरू नये आणि आपले कंत्राट का रद्द करू नये याचे स्पष्टीकरण मागितले आहे.

अनेक स्मशानभूमींत सावळागोंधळ
स्मशानभूमीमध्ये होणाऱ्या गैरकारभारासंबंधी नागरिकांनी तक्रार करणे आवश्‍यक आहे. महापालिका प्रशासनाकडून आता अजून कठोर कारवाई करण्यात येईल. शिवाय मुंबईतील सर्व स्मशानभूमींमध्ये अशाच प्रकारे सावळागोंधळ सुरू असून प्रत्येक प्रभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवणे आवश्‍यक असल्याचे अनिल गलगली यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com