कोस्टल रोडचा मार्ग मोकळा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 मे 2017

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदील

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदील
मुंबई - मुंबईच्या वाहतूक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नियोजित सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) उभारणीसाठी आवश्‍यक असणारी पर्यावरणविषयक अंतिम मंजुरी केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यावरणमंत्री अनिल दवे यांचे आभार मानले आहेत.

या मंजुरीमुळे मुंबईच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या "कोस्टल रोड'च्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करून तत्काळ त्याचे काम सुरू करता येणार आहे.

यापूर्वीदेखील विविध अधिसूचना काढून कोस्टल रोडसाठीच्या वेगवेगळ्या परवानग्या देण्यात आल्या होत्या. ही त्यातील अंतिम परवानगी आहे. या सागरी किनारा मार्गामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. गेली अनेक वर्षे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम विविध परवानग्यांअभावी रखडले होते.

राज्यातील सरकारने गेल्या दोन वर्षांत त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही आणि पाठपुरावा केल्याने हा प्रकल्प उभारण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

मुंबईच्या कोस्टल रोडसंदर्भातील "सीआरझेड'च्या अंतिम मंजुरीचा मसुदा पर्यावरण मंत्रालयाकडे सोपविण्यात आल्यानंतर त्याच्या मंजुरीची प्रक्रिया तातडीने करण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील दौऱ्यात केंद्रीय पर्यावरण व वने राज्यमंत्री अनिल दवे यांची भेट घेऊन राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात चर्चा केली होती. या चर्चेत कोस्टल रोडसाठी आवश्‍यक असणाऱ्या पर्यावरणविषयक अंतिम मंजुरीच्या मुद्यावर चर्चा झाली. त्या वेळी मसुदा मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच त्यासंदर्भातील अंतिम अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Web Title: costal road route clear