कोपर-पत्री पुलावरून नगरसेवक आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

डोंबिवलीतील कोपर पूल २८ ऑगस्टपासून वाहतुकासाठी बंद करण्याच्या सूचना रेल्वेने कल्याण-डोंबिवली पालिकेला दिलेल्या आहेत. या विषयात रेल्वेने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेवर केडीएमसी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. पालिका सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार भाषणे करत कोपर तसेच पत्रीपुलावरून रेल्वेवर टीकास्र सोडले. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य रमेश म्हात्रे आणि भाजपचे राहुल दामले यांनी याविषयी सभा तहकूबी मांडली होती. 

कल्याण : डोंबिवलीतील कोपर पूल २८ ऑगस्टपासून वाहतुकासाठी बंद करण्याच्या सूचना रेल्वेने कल्याण-डोंबिवली पालिकेला दिलेल्या आहेत. या विषयात रेल्वेने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेवर केडीएमसी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. पालिका सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार भाषणे करत कोपर तसेच पत्रीपुलावरून रेल्वेवर टीकास्र सोडले. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य रमेश म्हात्रे आणि भाजपचे राहुल दामले यांनी याविषयी सभा तहकूबी मांडली होती. 

शहरातील अनेक चांगले नागरिक येथील समस्यांमुळे शहर सोडून गेले आहेत. त्यात चांगले लेखक, कलाकारांचा समावेश असल्याचे म्हात्रे यांनी याविषयावर बोलताना सांगितले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या पुलांमुळे सामान्य नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला. 

रेल्वे प्रशासनाने कोपर पूल बंद करताना ठाकुर्ली येथील रेल्वे फाटक उघडावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांनी एकत्रितपणे या पुलांचे निरीक्षण केले आहे. मात्र रेल्वेने हा पूल बंद करण्याची भूमिका कायम ठेवल्याने पालिका प्रशासन हतबल असल्याचे पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सभेस सांगितले. 

शहरात राहण्याचा वीट आल्याचे विधान सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी केले. रेल्वे प्रशासन जर आपल्या अडचणींचा विचार करत नसेल तर त्यांचे पाणी बंद करा, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही समेळ म्हणाले. नगरसेवकांची नाराजी लक्षात घेऊन पीठासीन अधिकाऱ्यांनी सभा तहकूब झाल्याचे जाहीर केले.

   ठाकुर्ली उड्डाणपुलाचा आराखडा तयार करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना नव्वद फूट रस्त्याला जोडला जाणारा आराखडा तयार करण्यासाठी वारंवार सांगितले गेले होते. मात्र त्या सूचनेचा विचार करण्यात आला नाही. आज त्याचे दुष्परिणाम नागरिक सोसत आहे. 
-दीपेश म्हात्रे, 
स्थायी समिती सभापती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Councilor aggressive Kopar-Patri bridge