पबमधील बॉलीवूड गीतांवर न्यायालयाचा लगाम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई : देशभरातील 98 हॉटेल, रेस्टॉरंट आणि पबमध्ये वाजवण्यात येणाऱ्या बॉलीवूड गीतांवर आता न्यायालयाने लगाम लावला आहे. गाणी लावण्याचे परवाना शुल्क जमा केल्याशिवाय गाणी वाजवता येणार नाहीत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

मुंबई : देशभरातील 98 हॉटेल, रेस्टॉरंट आणि पबमध्ये वाजवण्यात येणाऱ्या बॉलीवूड गीतांवर आता न्यायालयाने लगाम लावला आहे. गाणी लावण्याचे परवाना शुल्क जमा केल्याशिवाय गाणी वाजवता येणार नाहीत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

राफिक परफॉर्मन्स लिमिटेडच्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेवर सुट्टीकालीन न्या. भारती डांग्रे यांच्यापुढे सुनावणी झाली. याचिकादार संस्थेकडे 20 लाखांहून अधिक गाण्यांचे स्वामित्व हक्क (कॉपिराईट) आहेत. ही गाणी वाजवण्यासाठी संस्थेकडून परवाना घेणे आवश्‍यक असते. मात्र अनेक आस्थापना नाताळ आणि नवीन वर्षाच्या दरम्यान शुल्क न भरता सर्रासपणे गाणी वाजवत असतात. अशा आस्थापनांना मनाई करण्याची मागणी याचिकादारांनी केली होती. मात्र मूळ गाण्याचे हक्क याचिकादाराकडे नाहीत, त्यामुळे त्यांना परवाना शुल्क वसूल करण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद आस्थापनांच्या वतीने करण्यात आला होता.

याचिकादाराने संबंधित मूळ हक्क असलेल्या कंपन्यांना प्रतिवादी करावे, अशी मागणी हॉटेल-रेस्टॉरंटच्या वतीने करण्यात आली. मात्र या मुद्यावर सविस्तर सुनावणी सुट्टीनंतर घेता येईल. तूर्तास गाण्यांचे परवाना हक्क याचिकादाराकडे आहेत असे प्रथमदर्शनी दिसून येते, त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात गाणी लावण्यापूर्वी परवाना शुल्क द्यायला हवे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. एकूण 98 हॉटेल यादीमध्ये पंचतारांकित हॉटेलसह अनेक लोकप्रिय हॉटेलचा समावेश आहे. 

Web Title: court bans song which plays in pub