एकतर्फी प्रेमवीरास किनारा सफाईची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

 एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीबाबत वादग्रस्त संदेश तिच्या भावी वराला पाठवणाऱ्या युवकाविरोधातील फौजदारी फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे; मात्र पुन्हा असे कृत्य त्याने करू नये म्हणून त्याला वर्सोवा समुद्र किनारा साफ करण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

मुंबई - एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीबाबत वादग्रस्त संदेश तिच्या भावी वराला पाठवणाऱ्या युवकाविरोधातील फौजदारी फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे; मात्र पुन्हा असे कृत्य त्याने करू नये म्हणून त्याला वर्सोवा समुद्र किनारा साफ करण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

मैत्रिणीच्या भावी नवऱ्यालाच मैत्रिणीबाबत आक्षेपार्ह संदेश पाठवल्याची तक्रार संबंधित तरुणीने पोलिस ठाण्यात केली होती. या प्रकरणात दोन्ही पक्षकारांनी सामोपचाराने तोडगा काढला. यापुढे असे कृत्य करणार नाही, अशी हमी तरुणाने शपथपत्र दाखल करून दिली. त्यामुळे तक्रारदार तरुणीनेही संबंधित फिर्याद मागे घेण्यास समंती दिली. न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली.

न्यायालयातही तरुणीने तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शवल्यावर खंडपीठाने याबाबत सहमती दिली; मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत तरुणाला दंड व्हायला हवा, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले, परंतु जर आर्थिक दंड सुनावला तर त्याची भरपाई तो वडिलांकडून पैसे घेऊन करू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी समाजसेवेची शिक्षा योग्य ठरू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे एक महिनाभर शनिवार-रविवार वर्सोवा सागरी किनाऱ्याची स्वच्छता करण्याचे आदेश न्यायालयाने तरुणाला दिले. वर्सोवा स्वच्छता मोहीम पथकाचे प्रमुख ॲड. अफरोज शहा यांच्या पथकामध्ये सामील होऊन हे काम करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. याबाबतचा अहवाल पोलिसांनी दाखल केल्यावर तक्रार रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The court has cleared lover beach cleanup