भाजप नगरसेवक रामचंदानी यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली

दिनेश गोगी
मंगळवार, 5 जून 2018

उल्हासनगर : सिसिटीव्हीत फाईल चोरताना कैद झालेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी चोरलेली फाईल अद्यापही पोलीस ठाण्याला सुपूर्द केली नाही. त्यामुळे कल्याण न्यायालयाने त्यांची जामीन याचिका पुन्हा फेटाळून लावली आहे. आता रामचंदानी यांच्याकडे उच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय असून तोपर्यंत त्यांच्यावर आधारवाडीच्या जेलमध्येच राहण्याची वेळ आली आहे. 

उल्हासनगर : सिसिटीव्हीत फाईल चोरताना कैद झालेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी चोरलेली फाईल अद्यापही पोलीस ठाण्याला सुपूर्द केली नाही. त्यामुळे कल्याण न्यायालयाने त्यांची जामीन याचिका पुन्हा फेटाळून लावली आहे. आता रामचंदानी यांच्याकडे उच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय असून तोपर्यंत त्यांच्यावर आधारवाडीच्या जेलमध्येच राहण्याची वेळ आली आहे. 

पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॅबिन मध्ये जाऊन फाईल चोरणाऱ्या भाजपचा स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी याच्या कारनाम्याचा पर्दाफाश सीसीटीव्ही कॅमेराने केला आहे. विशेष म्हणजे 10 मे या तारखेच्या दुपारची ही व्हीडीओ क्लिप रामचंदानी याचा वाढदिवस असलेल्या 11 तारखेला रात्री उशिरा व्हायरल झाली. त्यानंतर उल्हासनगरातील राजकिय व पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. 

याप्रकाराची तात्काळ दखल घेऊन आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता महेश सितलानी यांनी 12 तारखेला नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार रामचंदानी यांच्यावर सरकारी फाईल चोरल्या प्रकरणी कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

 

10 तारखेला दुपारी 1 वाजून 51 मिनिटांनी प्रदिप रामचंदानी, ठेकेदार शशांक मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जितू चोईथानी, नागदेव हे कॅबिन मध्ये चर्चा करत होते. ही दुपारी जेवणाची वेळ होती. काही मिनिटांनी सर्व बाहेर गेल्यावर रामचंदानी कॅबिन मध्ये येतात. आणि कपाटातील फाईल काढून शर्टाच्या आत लपवतात आणि बाहेर जातात. या व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे रामचंदानी यांच्यावर अटकेची नामुष्की ओढावली आहे. 

महापालिकेच्या मुख्यालयात सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आयुक्तांना लेखी पत्र दिल्यावर सीसीटीव्हीचे पुटेज मिळू शकतात. हा नियम असताना या नियमाचे उल्लंघन करून पुटेज व्हायरल करण्यात आले आहेत. हे काम कुणी केले? त्यात कुणाचा हात आहे? असा सवाल 2 जुलै नंतरच्या मुख्यसभेत केला जाणार आहे. या प्रकाराची चौकशी करून पालिकेतील फुटेज सार्वजनिकरित्या व्हायरल करण्यात भूमिका निभावणाऱ्या पालिकेच्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती भाजपा नगरसेवक मनोज लासी यांनी दिली.

"रामचंदानी यांनी जी फाईल चोरली ती अद्यापही पोलिसांच्या सुपूर्द केली नाही. त्यासाठी दोनदा पोलीस कष्टडी न्यायालयाने दिली. पुढे न्यायालयीन कष्टडी मिळाल्यावर वकिलांनी कल्याण न्यायालयात रामचंदानी यांच्या विरोधात सीसीटीव्ही पुटेज आणि ओरिजिनल फाईल मिळाली नसल्याचा युक्तिवाद केला आहे. त्यामुळे न्यायालयाने जामीन याचिका फेटाळली आहे. आता रामचंदानी यांना उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. प्रकरण न्यायालयात येईपर्यंत त्यांना आधारवाडी जेल मध्ये राहावे लागणार आहे." 
सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The court rejected the bail plea of BJP corporator Ramchandani