मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर जवळ जवळ एक वर्षावर, कोरोना नियंत्रणात असला तरीही गाफील राहू नका

समीर सुर्वे
Wednesday, 18 November 2020

मुंबईतील कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 320 दिवसांवर पोहचला आहे

मुंबई, ता.18: मुंबईतील कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 320 दिवसांवर पोहचला आहे. तर बी सॅन्डहर्स्ट रोड प्रभागात 17 नोव्हेंबर रोजी एकही रुग्ण आढळलेला नाही. सी काळबादेवी, मरीनलाईन्स गिरगाव या प्रभागात 17 नोव्हेंबर रोजी 3 नवा रुग्णांची नोंद झाली आहे.

सी विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी  809 दिवसांवर पोहचला आहे. ई, बी, एफ-दक्षिण आणि जी-उत्तर या विभागांमध्ये रुग्ण दुपटीच्या कालावधीने 500 दिवसांचाा टप्पा पार केला आहे. तीन प्रभागांमध्ये हा कालावधी 400 दिवसांपेक्षा अधिक असून 8 प्रभागात 300 आणि 8 प्रभागात 200 दिवसांचा टप्पा पार झाला आहे.

सध्या कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईत 17  हजार 467 खाटांची व्यवस्था असून यापैकी 12  हजार 529  खाटा या रिक्त आहेत. मात्र, असे असले तरीही कोविड बाधित रुग्णांसाठी आवश्यक असणारा प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता खाटा, व्हेन्टीलेटर इत्यादींची व्यवस्था पुरेशा प्रमाणात करण्यात आली असून त्याचा दैनंदिन स्वरुपात आढावा नियमितपणे घेतला जात आहे असेही महापालिकेकडून सांगण्यात आले.

महत्त्वाची बातमी : "मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल पण तो भाजपचाच, बाळासाहेबांच्या संघर्षासाठी उभे राहू." - फडणवीस

रुग्णवाढीचा दरही घटला 

मुंबईत रुग्णसंख्या वाढीमध्ये देखील लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढीचा दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक असल्याचे मानले जाते. हे पाहता, 29  ऑक्टोबर रोजी  रुग्णवाढीचा दर 0.44 टक्के, 5 नोव्हेबरला 0.33 टक्के आणि 17 नोव्हेंबर रोजी 0.22 टक्के इतका होता. 

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 

  • 21 ऑक्टोबर -100 दिवस 
  • 29 ऑक्टोबर -157 दिवस
  • 5 नोव्हेंबर -.208 दिवस
  • 17 नोव्हेबर -320 दिवस

महत्त्वाची बातमी : पत्रिपुलासाठी मेगाब्लॉक! मध्य रेल्वेचे वेळापत्रक जाहीर; पर्यायी एसटी, केडीएमटी, टीएमटी विशेष बसेस सोडणार

नियमित तपासणी 

नागरिकांशी तुलनेने अधिक संपर्क येणाऱ्या व्यवसायिकांची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करुन घेण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत विविध दुकानदार, दुकानात किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक, वाहक यांची कोविड विषयक चाचणी नियमितपणे करण्यात येत आहे. या चाचणीदरम्यान बाधित रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय औषधोपचार करण्यासोबतच त्यांचे विलगीकरण करणे, समुपदेशन करणे इत्यादी कार्यवाही देखील करण्यात येत आहे. 244 ठिकाणी पालिकेने चाचणीची सोय केली आहे. दरम्यान कोविड नियंत्रणात असला तरीही गाफिल राहून चालणार नाही. सामाजिक अंतर, वैयक्तिक स्वच्छता पाळावी तसेच मास्कचाही वापर करावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

covid 19 patients doubling rate reached almost one year in mumbai but dont take it granted


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 patients doubling rate reached almost one year in mumbai but dont take it for granted