मेट्रोचे नऊ बोगदे तयार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भूमिगत मेट्रो-३ मार्गातील बोगद्यांचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. एकूण ३२ पैकी नऊ बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) देण्यात आली.

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भूमिगत मेट्रो-३ मार्गातील बोगद्यांचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. एकूण ३२ पैकी नऊ बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) देण्यात आली.

मेट्रो-३ हा ३३.५ किलोमीटरचा प्रकल्प पूर्णपणे भूमिगत असून, त्यासाठी २३ हजार १३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई शहराला पश्‍चिम उपनगराशी जोडण्यासाठी हा मेट्रोमार्ग महत्त्वाचा मानला जातो. यातील आरे ते वांद्रे-कुर्ला संकुल हा पहिला टप्पा २०२१ पर्यंत कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर बीकेसी ते कफ परेड टप्प्याचे काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

या भूमिगत मेट्रो मार्गासाठी ५२ किलोमीटरच्या बोगद्यांचे काम करावे लागणार असून, त्यातील २३.६९ किलोमीटरचे काम एप्रिलच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. धारावी आणि आग्रीपाडा परिसरातील बोगद्यांच्या एकूण ७९९२ मीटर कामापैकी ४७४४ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. वरळी आणि धारावी स्थानकांच्या परिसरातील ६२६७ मीटरचे कामही पूर्ण झाले आहे.

गोदावरी-१ या यंत्राद्वारे देशांतर्गत विमानतळ स्थानकासाठी २.९ किलोमीटरच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम ४५५ दिवसांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मिठी नदीखालून जाणारा बोगदा, हे सर्वांत महत्त्वाचे मानले जाणारे काम मेट्रो-३ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.

१७ बोअरिंग मशीन
मेट्रो-३ मार्गावरील बोगद्यांचे काम सात टप्प्यांत होत आहे. हे काम सर्व ठिकाणी सुरू असल्यामुळे कमी वेळेत जास्त काम केले जात आहे. या कामासाठी १७ बोअरिंग मशीन कार्यरत असून, दर दिवशी सुमारे ३१ मेट्रिक टन मातीचे उत्खनन केले जात आहे.

Web Title: Created nine tunnels Metro