श्रेयवादात नवी मुंबईतील विकास प्रकल्प रखडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे श्रेय घेण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे, गेल्या सहा महिन्यांपासून तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले आठ प्रकल्प खितपत पडून आहेत. 

नवी मुंबई : महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे श्रेय घेण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे, गेल्या सहा महिन्यांपासून तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले आठ प्रकल्प खितपत पडून आहेत. 

घणसोली येथे महापालिकेने सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या सेंट्रल पार्कची उद्‌घाटनाअभावी दुरवस्था होऊ नये म्हणून अखेर उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट आणण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाची रचना असल्यामुळे ग्रंथालय, बहुउद्देशीय इमारत, उद्याने, अपंगांसाठी तयार केलेले सेन्सरी गार्डन आदी महत्त्वाच्या सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागले आहे. 

महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकांपूर्वीच घणसोली सावली गाव येथील सेंट्रल पार्क तयार केले आहे. पंचमहातत्त्वांवर आधारीत सर्व सुविधांनी सज्ज असे उद्यान तयार होऊनही या उद्यानांचा नागरिकांना लाभ घेता येत नाही. ऐरोली सेक्‍टर ५ येथे गोरगरीब मुलांसाठी ग्रंथालयाची इमारतही तयार झाली आहे. या इमारतीचे उद्‌घाटन केल्यास या ठिकाणी अभ्यासिका वर्ग सुरू करता येणार आहेत; मात्र उद्‌घाटन न झाल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी दर्जेदार सुविधेपासून दूर राहिले आहेत. ऐरोली सेक्‍टर १७ व शिरवणे सेक्‍टर १ येथे तयार झालेल्या बहुउद्देशीय इमारतींचे कामही अभियांत्रिकी विभागाने काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केले आहे, परंतु त्याला अद्याप सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी उद्‌घाटनासाठी हिरवा कंदील प्रशासनाला दाखवलेला नाही. 

सानपाडा शहरातील नागरिक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने तयार केलेल्या समाजमंदिराच्या उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. शहरातील अपंगांकरिता विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करणारी राज्यातील पहिली महापालिका म्हणून लौकिक असलेल्या महापालिकेने अपंगांसाठी तयार केलेले सेन्सरी गार्डन सुरू करण्याचा विसर तर नाही पडला ना, अशी संतप्त प्रतिक्रिया अपंग मुलांच्या पालकांकडून उमटत आहे. तुर्भे येथील क्‍लॉक टॉवर आणि सुशोभीकरण झालेल्या कोंडवाड्याचीही एकसारखीच अवस्था असल्याने या प्रकल्पांचा लाभ विधानसभा निवडणुकांच्या आधी घेता येईल का, असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

रखडलेले प्रकल्प 
 ऐरोली सेक्‍टर ५ मधील ग्रंथालय इमारत.  
 ऐरोली सेक्‍टर १७ येथील बहुउद्देशीय इमारत. 
 नेरूळ-शिरवणे सेक्‍टर १ ची बहुउद्देशीय इमारत.
 सानपाडामधील शाहीर अण्णा भाऊ साठे समाजमंदिर. 
 सानपाडा सेक्‍टर १० सेन्सरी गार्डन.
 तुर्भे सेक्‍टर २१ सुशोभीत केलेला कोंडवाडा. 
 तुर्भेतील क्‍लॉक टॉवर.
 घणसोलीतील सेंट्रल पार्क.

पुन्हा विधानसभा निवडणुकांचा अडसर
लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अडकलेले हे प्रकल्प पुढील १५ दिवसांत उद्‌घाटन न केल्यास पुन्हा विधानसभेच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्‍यता आहे. तर उद्‌घाटन केल्यास आयतीच श्रेय घेण्याची संधी मिळणार आहे. त्याअनुषंगाने महापौर जयवंत सुतार यांनी प्रशासनाकडून रखडलेल्या प्रकल्पांची माहिती गोळा करण्यास सुरूवात केली आहे. लवकरच यातील काही प्रकल्पांचे उद्घाटन लवकरच केले जाणार आहे. अशी माहिती सुतार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Credit development projects in Navi Mumbai Shepherdess