
Crime News : विमानात क्रू मेंबरचा विनयभंग; स्वीडिश नागरिकाला सहार पोलीसांकडून अटक...
मुंबई : विमानसेवा पुरवणाऱ्या इंडिगो कंपनीच्या फ्लाइटमध्ये क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी एका 63 वर्षीय स्वीडिश नागरिकाला सहार पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.क्लास एरिक वेस्टबर्ग असे अटक आरोपीचं नाव असून तो स्वीडन देशाचा नागरिक आहे. वेस्टबर्ग हा गेल्या तीन महिन्यांत कथित बेशिस्त वर्तनासाठी अटक करण्यात आलेला आठवा प्रवासी आहे.
इंडिगो कंपनीच्या बँकॉक-मुंबई फ्लाइटमध्ये गुरुवारी ही विनयभंगाची घटना घडली आहे. या घटने दरम्यान आरोपी क्लास एरिक वेस्टबर्ग हा कथितपणे मद्यधुंद अवस्थेत होता, विमानातील खाद्यपदार्थ खरेदी करताना क्रू मेंबरला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आणि हस्तक्षेप करणाऱ्या सहप्रवाशाला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
विमान मुंबई विमानतळावर उतरल्यावर वेस्टबर्गला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 354 (विनयभंग) आणि विमान कायद्याच्या इतर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.