पोलिसांना चकवण्यासाठी बदलली चेहरेपट्टी!

Crime-Scene
Crime-Scene

मुंबई  - घाईगडबडीत रिक्षात विसरलेली सोन्याची बॅग प्रवाशाला प्रामाणिकपणे परत न करता ती लंपास करण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकाला थेट गजाआड घेऊन गेला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी रिक्षाचालकाने थेट आपली चेहरेपट्टीही बदलली होती; पण पोलिसांच्या जाळ्यात तो सापडलाच. गोवंडी पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली. ताजनाथ जयप्रकाश मोर्या असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने सोमवार (ता. २१)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार मंगळवारी (ता. १५) जळगावहून कुर्ला टर्मिनसला आले होते. चेंबूरला जाण्याकरता त्यांनी दोन रिक्षा केल्या. एका रिक्षात तक्रारदार आणि दुसऱ्या रिक्षात त्यांचे नातेवाईक बसले होते. उतरण्याच्या गडबडीत त्यांची सात तोळे सोने असलेली बॅग ते रिक्षातच विसरले. ताजनाथच्या मात्र ते निदर्शनास आले.

तरीही त्याने तेथून रिक्षा जोरात पळवली. काही वेळाने सोने असलेली बॅग रिक्षात विसरल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले. त्यांनी ताजनाथच्या रिक्षाचा नंबर लिहून ठेवला होता. त्यांनी चेंबूर परिसरात रिक्षा शोधली. अखेर शुक्रवारी (ता. १८) गोवंडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. वरिष्ठ निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक खरात, पोलिस हवालदार संपत नाळे, जीवन मोहिते, पोलिस नाईक अनिल थोरात आदींचे पथक तयार झाले. तपासादरम्यान पोलिसांनी कुर्ला, गोवंडी आदी परिसरातील १०० रिक्षाचालकांची चौकशी केली. ती रिक्षा आरसीएफच्या विष्णूनगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ताजनाथला ताब्यात घेतले.

पाच तोळे साेने जप्त
चौकशीत ताजनाथ जयप्रकाश मोर्या याने चोरीची कबुली दिली. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने आपली चेहरेपट्टीही बदलली होती. मात्र सतर्क पोलिसांनी त्याचा भांडाफोड केला. चोरीचे सोने त्याने घरी लपवून ठेवले होते. त्याच्याकडून पाच तोळे सोने पोलिसांनी जप्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com