Crime : 'ऑनलाइन जॉब' फसवणूक प्रकरणी 12 आरोपींना अटक; दुबई-हाँगकाँगमधील खात्यांवर जायचे पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

Crime : 'ऑनलाइन जॉब' फसवणूक प्रकरणी 12 आरोपींना अटक; दुबई-हाँगकाँगमधील खात्यांवर जायचे पैसे

मुंबई : अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने होत असलेल्या ऑनलाइन टास्क फसवणुकीवर कारवाई करताना मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने गेल्या 10 दिवसांत 12 आरोपींना अटक केली आहे.

वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासादरम्यान सायबर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी मुंबई शहरभर तीन मोठे छापे टाकले. या छापेमारीत सायबर पोलिसांना सायबर फसवणूक करणाऱ्या 3 टोळ्यांचा भंडाफोड करण्यात मदत झाली.

या टोळ्या आपल्या गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी कार्यालयीन जागा अल्प कालावधीसाठी भाड्याने घेत. तेथून सायबर फसवणूक करत असत. यातील एक टोळी दुबई आणि हाँगकाँगमधील परदेशी ऑफशोअर खात्यांवर पैसे पाठवत असल्याचेही आढळून आले.

170 हून अधिक प्रकरणे

पोलिस उपायुक्त सायबर क्राईम बालसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसर टास्क फ्रॉडच्या वाढत्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी 10 पोलीस पथके तयार केली आहेत. मुंबई शहरात या प्रकारच्या 170 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. 51 प्रकरणांमध्ये, पीडितांनी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम पिडीत व्यक्तींनी गमावली आहे. एकूण 170 प्रकरणात एकूण 5.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पिडीतानी गमावली.

तिन्ही प्रकरणांमध्ये,गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी कार्यालयीन जागा अल्प कालावधीसाठी टोळ्या भाड्याने घेत होत्या. या टोळ्या कॉर्पोरेट कंपन्यांसारखे वागत असत. अर्थात या कंपन्याही बनावट होत्या - बनावट आधार आणि पॅनकार्डच्या आधारे बनवल्या होत्या. कंपन्या या अल्प कालावधीसाठी कर्मचारी देखील नियुक्त करत होते.

सायबर पोलिसांच्या दक्षिण विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात कुलाबा येथील एका रहिवाशाचे एका आठवड्यात 25 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी तपास करताना दक्षिण मुंबईत सायबर टीमने आठ ठिकाणी छापे टाकले . पोलीस कारवाईत पोलिसाना अनेक मोबाईल फोन सापडले ज्याद्वारे सायबर फसवणूक केली गेली होती.

पोलिसाना शेल कंपन्यांची अनेक बनावट कागदपत्रे देखील सापडली. ज्याच्या आधारावर आरोपीनी विविध बँकांमध्ये 180 बनावट खाती ठेवली होती. या बँक खात्यात फसवणूक केलेले पैसे हस्तांतरित केले गेले.सायबर पोलिसांनी या टोळीतील 6 जणांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपी अंधेरीचा रहिवासी तुषार अजवानी 6 वेगवेगळ्या बनावट कंपन्या चालवत असल्याचे आढळून आले.

कोट्यावधींची बँक खाती

डीसीपी राजपूत यांनी असेही सांगितले की या ऑपरेटर्सची सर्व खाती गोठवण्यात आले आहेत. ज्यात 25 कोटी रुपये होते. इतर दोन टोळ्यांचा मुंबई सायबर पोलिसांच्या पूर्व विभागातील अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. एका प्रकरणात, 27 लाख रुपये गमावलेल्या चेंबूरच्या रहिवाशाच्या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना, पोलिसांनी मीरा रोड, भाईंदर आणि ठाणे परिसरात केलेल्या कारवाया करत आरोपींना अटक केली.या प्रकरणातील तिघेही आरोपी राजस्थानचे रहिवासी आहेत.