विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

ऐरोली सेक्‍टर ४ मधील सुशीलादेवी देशमुख (एसडीव्ही) विद्यालयातील शिक्षिकेने पहिलीच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. याप्रकरणी कोणतेही कारण नसताना मारहाण करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थांच्या पालकांकडून करण्यात आला आहे.

नवी मुंबई : ऐरोली सेक्‍टर ४ मधील सुशीलादेवी देशमुख (एसडीव्ही) विद्यालयातील शिक्षिकेने पहिलीच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. याप्रकरणी कोणतेही कारण नसताना मारहाण करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थांच्या पालकांकडून करण्यात आला आहे. शिक्षिकेने केलेल्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या कानातून रक्त आले असून, मुलांमध्ये शाळेविषयी भीती निर्माण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत रबाळे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला होता. त्यानुसार कलम ७५, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम अंतर्गत शिक्षिकेला अटक करण्यात आली होती. या शिक्षिकेला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ऐरोली सेक्‍टर-४ येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील पहिलीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी जय भंडारी (५ वर्ष) हा मागील काही दिवसांपासून घाबरून शाळेत जाण्यास टाळाटाळ करीत होता. शनिवारी (ता.२९) अर्धा दिवस शाळा असल्याने, जय घरी आल्यावर त्याच्या डाव्या कानावर व गळ्यावर काळपट वण व कानाखाली रक्ताची जखम पालकांना आढळून आली. त्यावेळी पालकांनी त्याच्याकडे विचारणा केली असता, वर्गशिक्षिकेने माझ्यासह वर्गातील इतर मुलांनादेखील मारहाण करून चिमटा काढल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी घडला प्रकार देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिला. या विद्यार्थ्यांला वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, वर्गशिक्षिके विरोधात रबाळे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर शिक्षिकेला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जमिनावर सुटका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against a teacher who beat a student