सात कोटींच्या फसवणुकीबद्दल कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मार्च 2019

दक्षिण आफ्रिकेतील युरेनियम व हिऱ्यांच्या खाणींमधील गुंतवणुकीवर मासिक 15 टक्‍के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून सात कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार एका व्यावसायिकाने केली.

मुंबई - दक्षिण आफ्रिकेतील युरेनियम व हिऱ्यांच्या खाणींमधील गुंतवणुकीवर मासिक 15 टक्‍के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून सात कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार एका व्यावसायिकाने केली. त्यावरून पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

एका शेअर दलाल कंपनीचे वित्तीय सल्लागार दिलीपकुमार नागपाल यांच्या तक्रारीवरून किरणकुमार मेहता व कैलास अग्रवाल यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपाल यांनी 45 लाख रुपये आरोपींच्या कंपनीत गुंतवले होते. त्यांच्यासह आणखी काही जणांची एकूण सात कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या गुंतवणूकदारांनी 2010 ते 2013 या काळात ही रक्कम गुंतवली. त्यानंतर आरोपीनी भायखळ्यातील कार्यालय बंद केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी आरोपींनी आपण पोलाद व्यवसायात असून, आफ्रिकेतील मादागास्करमध्ये युरेनियम व हिऱ्यांच्या खाणी असल्याचे सांगितले होते. या खाणींच्या विस्तारासाठी निधीची आवश्‍यकता असून, त्याच्या बदल्यात 15 टक्के व्याज देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते; परंतु आरोपींनी गुंतवणूकदारांना दिलेले धनादेश वटले नाहीत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्या प्रकरणी तक्रारदारांनी प्रथम दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. 

बॅंकांना अडीच हजार कोटींचा गंडा 
बॅंकेचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली दोन्ही आरोपींच्या विरोधात सीबीआयने 2016 मध्ये गुन्हा दाखल केला होता. चेन्नईतील एका बॅंकेची 330 कोटी रुपयांची, तर आणखी एका बॅंकेची 1593 कोटी रुपयांची अशी एकूण अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपींनी 2007 ते 2013 या काळात बॅंकांमधून कर्ज घेतले होते. 

Web Title: Crime against two company directors about seven crore frauds