भुजबळांचा पाय आणखी खोलात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

कोट्यवधींचे काळे धन पांढरे करणाऱ्या बोगस कंपन्यांचा पर्दाफाश

कोट्यवधींचे काळे धन पांढरे करणाऱ्या बोगस कंपन्यांचा पर्दाफाश
मुंबई - काळा पैसा पांढरा करून देणाऱ्या बोगस कंपन्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी शनिवारी देशभरात छापे टाकले. दिवसभरात 2300 बनावट कंपन्यांवर छापे टाकण्यात आले. त्यात एकट्या मुंबईतील सुमारे 700हून अधिक कंपन्यांचा समावेश आहे. मुंबईतील कंपन्यांमार्फत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे 46.7 कोटी रुपये पांढरे करण्यात आल्याची माहिती या कारवाईतून समोर आली. त्यामुळे भुजबळ यांच्यासमोरील अडचणींत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत 35 ठिकाणी छापे टाकण्यात आले. शहरातील बोगस कंपन्यांनी 20 तोतया संचालक उभे केले होते. त्यांच्यामार्फत भुजबळांसाठी 46.7 कोटी रुपयांची बेहिशेबी रुपये पांढरे करण्यात आले, असे उघडकीस आले आहे. मुंबईत छापे टाकण्यात आलेल्या बोगस कंपन्यांची गेल्या वर्षी 1500 कोटींची बेहिशेबी रक्कम दुबई व हॉंगकॉंगला पाठवणाऱ्या राजेश्‍वर एक्‍स्पोर्टशीही संबंध आहे. या बोगस कंपन्यांमार्फत राजेश्‍वर एक्‍स्पोर्टचे दोन कोटी रुपये व्यवहारात आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेश्‍वर एक्‍स्पोर्टविरोधात "ईडी'ने यापूर्वी काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे; तर 870 कोटींच्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी भुजबळ अटकेत आहेत. "ईडी'च्या पथकाने शनिवारी टाकलेल्या छाप्यांनंतर बोगस कंपन्यांच्या संचालकांपासून चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत 40 जण रडारवर आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: crime on chagan bhujbal