
Crime News : गुटखा व तंबाखूची विक्री करु देण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदाराला अटक
भाईंदर : गुटखा व तंबाखूची विक्री करु देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अमितकुमार पाटील या पोलिस हवालदारासह दोनजणांना अटक केली आहे.
या प्रकरणी लचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार्या तक्रारदाराचे दुकान आहे. त्यात तो याआधी गुटखा व तंबाखूची विक्री करत होता. मात्र सध्या त्याने गुटखा विक्री बंद केले होते. असे असताना अमितकुमार पाटील याने त्याच्याकडे गुटखा व तंबाखू विक्री करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे दोन महिन्याचे सोळा हजार रुपये मागितले होते.
परंतू तक्रारदाराला पाटील याला पैसे द्यायचे नसल्याने त्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदवली. त्यानंतर या विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता अमितकुमार पाटील याच्या उपस्थितीत संजय यादव या व्यक्तीने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली व अमितकुमार पाटील याने पुढील बोलणी अमित मिश्रा याच्यासोबत करण्यास तक्रारदाराला सांगितले.
त्यानंतर अमित मिश्रा व संजय यादव यांनी लाचेची रक्कम दहा हजार इतकी नक्की केली व ही रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारत असताना अमित मिश्रा याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अमितकुमार पाटील यालाही ताब्यात घेतले.