ठाण्यात दुसऱ्या दिवशी बेशिस्त पार्किंगला दणका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

दोनशेहून अधिक गाड्या जप्त; शेकडो गाड्यांची हवा गुल

दोनशेहून अधिक गाड्या जप्त; शेकडो गाड्यांची हवा गुल
ठाणे - ठाणे महापालिकेने पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी (ता.12) बेशिस्त वाहनधारकांना धडा शिकवला. स्टेशन परिसर, स्टेशन रोड, बाजारपेठ आणि जांभळीनाका भागातील सुमारे 200 गाड्या ताब्यात घेण्यात आल्या, तर रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या शेकडो गाड्यांच्या टायरमधील हवा काढण्यात आली. कारवाईला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी खाक्‍या दाखवला.

ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण केल्यानंतर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांविरुद्ध धडक कारवाई केली, तर आज बेशिस्त पार्किंगवर कारवाई करण्यात आली. पालिकेने आजही गावदेवी परिसरातून कारवाईला सुरुवात केली. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांबरोबर फुटपाथवर हातपाय पसरलेल्या दुकानदारांविरोधातही कारवाई करण्यात आली. त्यानंतर या पथकाने स्टेशन परिसरातील दोनशेहून अधिक दुचाकी ताब्यात घेतल्या. यापैकी अनेक दुचाकींवर पोलिस, रेल्वे आणि प्रेस असे लिहिले होते.

या पथकाचे पुढचे लक्ष्य होते स्टेशन रोडवरील वाहने. बेकायदा उभ्या केलेल्या या वाहनांच्या टायरमधील हवा काढून टाकण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. पार्किंगला जागा नसल्याचे सांगितले. मात्र पथकाने कारवाई केली. ही कारवाई सुरू असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली, असा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला.

या पथकाला काही ठिकाणी कचरा आढळला. पालिकेच्या पथकाने तो उचलण्यास फेरीवाले, दुकानदार यांना भाग पाडले. एका अतिक्रमण केलेल्या दुकानाचे पत्रे तोडून ही कारवाई आजच्यापुरती थांबवण्यात आली. या कारवाईत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, उपायुक्त संजय हेरवाडे आणि उपायुक्त अशोक बुरपुल्ले, नौपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

फेरीवाले न्यायालयात जाणार
ठाणे महापालिका आयुक्तांनी केलेली कारवाई बेकायदा असल्याचा दावा फेरीवाला समन्वय समितीने केला आहे. पालिकेच्या कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा समन्वय असंघटित फेरवाला संघटनेचे पदाधिकारी दीपक घनसानी यांनी दिला आहे. उपायुक्त संदीप माळवी यांनी प्रथम मारहाण केल्यामुळे गाळेधारकाने त्यांच्यावर हात उचलला, असा दावा फेरीवाल्यांनी आहे.

आयुक्तांचा रुद्रावतार व्हायरल
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कालच्या कारवाईचा व्हिडीओ शुक्रवारी सकाळी समाज माध्यमांवर व्हायरल झाला. पालिका आयुक्तांनी धारण केलेला रुद्रावतार त्यांना अशोभनीय होता, असे काहींचे मत होते; तर काहींनी, शहाराला शिस्त लावण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एका व्हिडीओमध्ये पालिका आयुक्त एका रिक्षाचालकाला मारहाण करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते एका तरुणाला धक्काबुक्की करत असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या व्हिडीओमध्ये आयुक्तांचे अंगरक्षकच फेरीवाले आणि दुकानदारांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

Web Title: crime on illegal parking