
Mumbai News : मुंबईत 2 वर्षाच्या मुलाचे अपहरण; आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत
मुंबई : मुंबईत गोवंडी परिसरात 2 वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून बाळाची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. मलीकराम यादव असे 34 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.
सहा दिवसांपूर्वी 3 मार्चला गोवंडी परिसरातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक करून या मुलाची सुटका केली. दरम्यान, मूल होत नसल्यामुळे या मुलाचे अपहरण केल्याचे आरोपीने चौकशीत कबुल केले.
गोवंडीत वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील दोन वर्षांचा मुलगा 3 मार्च रोजी घराबाहेर खेळत होता. त्यावेळी अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले. मुलगा सापडत नसल्याने त्याच्या आई, वडिलांनी याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली असता आरोपी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गेल्याचे उघडकीस आले.
आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ आरपीएफला याबाबत माहिती दिली. त्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी लखनऊ येथे जाऊन आरोपीला मुलासह ताब्यात घेतले. मलीकराम यादव असे 34 वर्षीय आरोपीचे नाव असून मूल होत नसल्याने आपण या मुलाचे अपहरण केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी यादवला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.