रॉकेल ओतून सुनेला पेटवले ; पतीसह सासूला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

शालेय प्रवेशासाठी मुलीची प्रमाणपत्रे घेण्यासाठी सासरी आलेल्या सुनेवर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील रघुनाथनगर येथे घडली. दक्षा अशोक मंगे (30) असे तिचे नाव आहे.

ठाणे : शालेय प्रवेशासाठी मुलीची प्रमाणपत्रे घेण्यासाठी सासरी आलेल्या सुनेवर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील रघुनाथनगर येथे घडली. दक्षा अशोक मंगे (30) असे तिचे नाव आहे. 70 टक्के जळाल्याने तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी दक्षाचा पती अशोक व सासूला अटक केली. त्यांना न्यायालयाने 17 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रघुनाथनगरमधील वालदास आशीष सोसायटीमधील अशोक मंगे यांच्याशी घाटकोपर येथील दक्षा हिचा विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून दक्षा हिचा पती अशोक मंगलदास मंगे (40) आणि सासू जमनाबेन (79) यांच्याकडून क्षुल्लक कारणावरून मानसिक, शारीरिक छळ तसेच मारहाण करायचे. या त्रासाला कंटाळून अडीच महिन्यापूर्वी दक्षा माहेरी घाटकोपर येथे राहायला आली होती. दक्षाची मुलगी दीक्षा हिला शाळेत प्रवेश घेण्यासाठी लागणारी प्रमाणपत्रे सासरी असल्याने शुक्रवारी 13 एप्रिलला ती वागळे इस्टेट येथे सासरी आली होती. तेव्हा मुलीच्या सर्टिफिकेटची मागणी केल्यावर तिची सासू जमनाबेन हिने दक्षाला स्वंयपाकघरात ओढत नेऊन तिच्यावर रॉकेल ओतले. त्यानंतर तिला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी दक्षा आणि तिची मुलगी दीक्षा हिने जोरजोरात आरडाओरडा केल्याने शेजारचे जमा झाले. त्यांनी दक्षाला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी, शनिवारी आरोपी सासू जमनाबेन आणि पती अशोक या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे करीत आहेत. 

Web Title: Crime Married Women Burn by Husband and her Mother in law