
Crime News : बोलण्यात गुंतवून ग्राहकाकडून दुकानदाराला गंडा
मुंबई : ग्राहकाने खरेदीच्या बहाण्याने दुकानात विशिष्ट नोटेची मागणी करून दुकानदार ती नोट शोधण्यात गुंतला असताना कॅश काउंटरवरून हजारो रुपये लंपास केल्याचा प्रकार बोरीवली पश्चिमेच्या रिलायन्स माय जिओ स्टोअरमध्ये घडला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
बोरिवली पश्चिम परिसरात रिलायन्स माय जिओ स्टोअरमध्ये रामजस यादव हे स्टोर असोसिएट म्हणून कार्यरत आहेत. 23 मार्च रोजी संध्याकाळी साडेसातला काम संपवून विक्रीतून झालेली एकूण रक्कम 55 हजार 500 त्यांनी मोजून ठेवले. रात्री जवळपास साडेनऊ वाजता 2 ग्राहक स्टोअरमध्ये आले आणि एकाने यादव यांना इयरफोन देण्यास सांगितले.
त्यानुसार यादव यांनी विविध इरफोन त्यांना दाखविले. ज्यात एक त्याने पसंत करत खरेदी केला. त्याची किंमत 399 रुपये सांगितल्यावर ग्राहकाने त्यांना 200 रुपयांच्या दोन नोटा व हेडफोन पॅक करत त्याला दिले. त्यानंतर त्या ग्राहकाने पुन्हा 200 रुपयांच्या दोन नोटा आणि 100 रुपयांची एक नोट देत त्या बदल्यात 500 रुपयांची नोट मागितली आणि यादवने त्याला ती काढून दिली.
मात्र त्या व्यक्तीने मला ही नोट नको तर आय अल्फाबेट असलेल्या सिरीजची नोट हवी आहे, असे यादवला सांगितले. मात्र, तशी नोट नसल्याचे स्पष्ट केल्यावर ग्राहकाने काउंटरमध्ये हात घालत नोटांचे गट्टे बाहेर काढून त्याला तपासायला लावले.
रामजस यादव यांनी नंतर विरोध सुरू केला त्यावर ठीक आहे, असे म्हणत ग्राहक निघून गेले. त्यामुळे यादव याने पुन्हा सर्व रक्कम मोजली, त्यावेळी त्यातून 10 हजार 500 रुपये कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी दोघांविरोधात बोरीवली पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.