
Mumbai Crime News : दुचाकीस्वारांची वाहतूक हवालदाराला मारहाण
डोंबिवली - कल्याण शीळ महामार्गावरील लोढा पलावा जंक्शन येथे वाहतूक नियोजन करणारे हवालदार मधुकर घुगे यांना दुचाकीस्वारांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी ही मारहाण झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात घुगे यांनी तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी भगवान गोरपेकर आणि दिपक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण शाखेत पोलिस हवालदार घुगे हे कार्यरत आहेत. मंगळवारी लोढा जंक्शन येथे ते वाहतूक सुरळीत करण्याचे आपले कर्तव्य बजावत होते. सायंकाळी 7.30 च्या सुमारास आरोपी भगवान व दिपक हे त्या परिसरातून दुचाकीवर जात होते. हवालदार घुगे यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला.
यावेळी आरोपींनी घुगे यांना शिवीगाळ करत पुढे जाऊन ते थांबले. घुगे यांच्याशी हुज्जत घालत त्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. भगवान याने घुगे यांची बोटे मुरगळत त्यांच्या डोळ्यावर मारले. दिपक याने देखील हाताच्या ठोशाने घुगे यांना मारहाण केली.
या मारहाणीत घुगे यांची वर्दी फाटली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली भगवान व दिपक यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.