नाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

Nana-Patekar
Nana-Patekar

मुंबई - 'हॉर्न ओके प्लिज' या चित्रपटात एका गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्याशी अश्‍लील वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह चार जणांविरोधात बुधवारी (ता. 10) रात्री ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्या चारही जणांचे जबाब ओशिवरा पोलिस नोंद करणार आहेत. जबाबानंतर साक्षीदारांचा शोध घेऊन व पुरावे गोळा करून पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.

तनुश्रीचा 2005 मध्ये पहिला चित्रपट प्रर्दशित झाला होता. दहा वर्षांपूर्वी गोरेगावच्या चित्रनगरीत "हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. त्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य हे करत होते. चित्रीकरणादरम्यान एका दृश्‍यावर तनुश्रीने आक्षेप घेतला. त्यानंतर तिने चित्रपटातून अचानक माघार घेतली होती. तिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन नाना यांच्यासह चौघांविरोधात गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती.

तनुश्रीने घडल्या प्रकाराबाबत दिग्दर्शक राकेश सांरग, समीर सिद्दिकी आणि गणेश आचार्यकडे तक्रार केली होती. या घटनेनंतर तनुश्रीही परदेशात गेली. दहा वर्षांनी ती भारतात परत आली. परत आल्यानंतर तनुश्रीने दहा वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाबाबत वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली होती.

तनुश्रीने शनिवारी (ता. 6) ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज केला होता. या तक्रारीनंतर नाना पाटेकर, राकेश सारंग, विवेक अग्निहोत्री, समीर सिद्दिकी यांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली होती.

तनुश्रीने तक्रारीत नानांवर असभ्य वर्तन करून विनयभंग केल्याचे म्हटले होते. त्यानंतर बुधवारी रात्री तनुश्री बुरखा घालून ओशिवरा पोलिस ठाण्यात आली. बी. के. सी. पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक कल्पना गाडेकर यांनी तनुश्रीचा जबाब नोंदवून घेतला. इंग्रजीत तिने आपला जबाब नोंदवला. त्या दिवशी घडल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. तनुश्रीच्या जबाबानंतर रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांनी नाना यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा नोंद केला. आता पोलिस त्या चौघांनाही चौकशीकरिता बोलावणार आहेत. तनुश्रीच्या वादात राजकीय पक्षांनी उडी घेतली. तिच्या समर्थनासाठी कॉंग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करून नानाच्या अटकेची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com