धक्कादायक! १९ वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधारकार्ड, कल्याणमध्ये कोट्यावधींचा घोटाळा

कुशिवली धरणाचे पाणी कोण चाखु पाहतेय... भूसंपादन मोबदला वाटप 20 टक्के वाटपातच कोट्यावधींचा घोटाळा उघड
crime news fraud case adhar card of death person who dies 19 years ago kushivali dam dombivali mumbai
crime news fraud case adhar card of death person who dies 19 years ago kushivali dam dombivali mumbaisakal

डोंबिवली - 19 वर्षापूर्वी माझे वडील वारले आहेत...तेव्हा आधार कार्ड हे कागदपत्रच अस्तित्वात नव्हते...मग त्यांच्या नावे आधारकार्ड तयार कसे झाले...आम्ही जास्त शिकलो नाही, परंतू वाचन आणि स्वतःची मराठीतून सही करण्यास आम्ही शिकलो आहोत. आमचा अंगठा घेतल्याचे दाखवित आमच्या नावाचे पैसे लाटण्यात आले आहेत....कोरोना काळात सारे व्यवहार ठप्प असताना कुशिवली धरण भूसंपादन मोबदला वाटपाची प्रक्रीया का राबविण्यात आली...आणि त्याची आधी शेतकऱ्यांना माहिती का देण्यात आली नाही...आमचे बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले आहे शिवाय संमतीपत्र तयार करुन मोबदला लाटण्यात आला आहे.

मुळात आमचा धरण प्रकल्पालाच विरोध असून मोबदला आम्ही घेऊच कसा...अशी संतप्त प्रतिक्रीया कुशिवली धरण प्रकल्पात जमिन संपादीत होणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कुशीवली धरण प्रकल्पसाठी भसंपादीत केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला वाटप सुरु झाले नाही तोच पहिल्याच टप्प्यात कोट्यावधीचा घोटाळा झाल्याची बाब उघड झाली आहे. संपादीत लाभधारकांना पहिल्या टप्प्यात 18.71 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येत असून यातील 11.51 कोटी रुपयांचे वाटप उल्हासनगर येथील उपविभागीय कार्यालयातून करण्यात आले आहे. या 20 टक्के वाटपातच ऐवढा मोठा घोटाळा झाला असून यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा हात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे धरणाचे पाणी कोण चाखत आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाणे जिल्ह्याला बारवी धरणातून पाणीसाठा होत असून जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता काळू, शाई धरणाचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी होत आहे. त्यातच कल्याण डोंबिवली शहराची वाढती लोकसंख्या, या लोकसंख्येची भविष्यातील वाढती गरज ओळखून येत्या काळात मलंगगड खोऱ्यातील कुशिवली धरण विकसित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. जेणेकरुन कल्याण डोंबिवली, 27 गाव परिसराला वाढीव व कायमस्वरुपी पाणी मिळेल अशी मागणी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जलसंपदा विभागाकडे केली. कुशिवली धरणाची मागणी जोर धरु लागताच प्रकल्प ग्रस्त सर्व पक्षीय शेतकरी संघर्ष समितीने उल्हासनगर येथील उप विभागीय कार्यालय येथे धाव घेतली असता त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. शेतकऱ्यांच्या नावे भूसंपादनाचा मोबदला लाटला गेल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कार्यालयात भूसंपादनाचा मोबदला घेण्यासाठी काही लोकांनी बोगस कागद पत्र उप विभागीय कार्यालयात प्रस्तावासाठी सादर केली असता चौकशी दरम्यान उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ याची चौकशी लावत आत्तापर्यंत याप्रकरणी एकूण 4 गुन्हे उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल केले आहेत.

या प्रकल्पासाठी 8540.60 हेक्टर जमिन संपादित केली जाणार असून आत्तापर्यंत 5242 हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. 3298.60 हेक्टर जागा अद्याप संपादित करणे शिल्लक आहे. संपादित जागेसाठी 18.71 कोटी मोबदल्याचे वाटप करण्यात येणार असून 11.51 कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आला असून 7.20 कोटी रक्कम शिल्लक आहे. बोगस कागदपत्र बनविणारी टोळी ही पूणे, जुन्नर या भागातील असल्याची माहिती समोर येत असून त्या अनुषंगाने देखील तपास सुरु आहे.

बाधित शेतकऱ्यांचे बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड याद्वारे बॅंकेत खाते काही लोकांनी उघडले. त्यानंतर प्रांताकडे सत्य प्रतित्रापज्ञ सादर केले, त्यानंतर उप विभागीय कार्यालयाकडून मोबदला त्यांना देण्यात आला आहे. शिकलेल्या शेतकऱ्यांचे देखील संमती पत्रावर अंगठे घेण्यात आले आहेत. 2019 पासून हा प्रकार सुरु होता. माझ्या नावे सुमारे 14 लाखांच्या आसपास रक्कम लाटण्यात आली आहे. तसेच माझे वडील नारायण म्हात्रे हे 1991 ला मयत झाले. ते मयत असताना त्यांना जिवंत दाखवून त्यांच्या नावे हा मोबदला लाटण्यात आला आहे.

- राजाराम म्हात्रे, शेतकरी

माझे आजोबा रामा बांगर हे मृत होऊन 19 वर्षे झाली आहेत, त्यावेळी आधार कार्ड नव्हते तरीही आजोबांच्या नावे आधार कार्ड बनविले, आजोबा जिवंत झाले कसे नी आधार कार्ड तयार झाले कसे.

- शिवाजी मुसळे, शेतकरी

आमची लागवड जमिन मोडून तेथे लेव्हल केली गेली आहे. आमचा या प्रकल्पाला विरोध असताना हा प्रकल्प येथे होतो कसा. आम्हा आदिवासी बांधवांना काही समजत नसल्याने अशाच जमिनी लाटल्या गेल्या आहेत, त्याचा एक पैसाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

- पोसुबाई झुगरे, माजी सरपंच खरड

कुशिवली प्रकल्प हा अंबरनाथ तालुक्यात लघु पाटबंधारे प्रकल्प असून त्याचे भूसंपादनाचे काम सुरु आहे. या कार्यालयात भूसंपादनाचा मोबदला घेण्यासाठी काही लोकांनी बोगस कागद पत्राद्वारे आमच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्याचा संशय आल्यामुळे चौकशी केली असता कागदपत्र बनावट आढळल्याने त्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याच अनुषंगाने मागील प्रकरणाची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये मयत व्यक्तीच्या नावे व दुसऱ्यांनी मोबदला नेल्याचे निदर्शनास आल्याने त्या नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकूण चार गुन्हे दाखल केलेले असून सर्व प्रकरणाची तपासणी करत आहोत. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर ही माहिती दिली जाईल. 25 सर्व्हे नंबर पर्यंत मोबदल्यांचे वाटप करण्यात आले आहे. म्हणजेच 20 टक्के जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे, उर्वरित जमिनींचा मोबदला देण्याचे काम स्थगित करण्यात आले आहे.

- जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी

कुशिवली धरणामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी आमचा वारंवार पाठपुरावा सुरु आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातच मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.

तत्कालिन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी हा मोबदला वाटप करताना कोणताही पंचनामा न करता मोबदला वाटप करत भ्रष्टाचार केला असून त्यांना पहिले अटक झाली पाहीजे. तसेच यामध्ये शिवसेनेचे नेता व राष्ट्रवादी सरपंचाचे भाऊ आहेत. अधिकारी यांच्यासोबतच सत्ताधारी पक्षातील पदाधिकारीही यामध्ये सामिल आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली नाही तर येत्या आठ दहा दिवसांत उप विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.

- गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व विधानसभा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com