अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

ऐरोली परिसरात बेकायदेशीररीत्या इमारतींचे व घरांचे आरसीसी बांधकाम करणाऱ्या आठ जणांविरोधात महापालिका प्रशासनाने रबाळे पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या या आठ जणांना महापालिकेने यापूर्वी अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत नोटीस बजावली होती; मात्र त्यांनी महापालिकेच्या नोटिसीला भीक न घालता आपले बांधकाम सुरूच ठेवले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या सर्वांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. 

नवी मुंबई - ऐरोली परिसरात बेकायदेशीररीत्या इमारतींचे व घरांचे आरसीसी बांधकाम करणाऱ्या आठ जणांविरोधात महापालिका प्रशासनाने रबाळे पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या या आठ जणांना महापालिकेने यापूर्वी अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत नोटीस बजावली होती; मात्र त्यांनी महापालिकेच्या नोटिसीला भीक न घालता आपले बांधकाम सुरूच ठेवले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या सर्वांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. 

या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलेल्या देवराम बळीराम मढवी याने दिवा गाव सेक्‍टर-9 भागात घर क्र. 56 येथे अनधिकृत बांधकाम केले आहे. मारुती गाडे यांनीही दिवा गाव सेक्‍टर-9 भागात अनधिकृत बांधकाम केले आहे. रबाळे येथील सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या बाबुराव उघाडे व इतर लोकांनी सिद्धार्थनगरमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आले आहे. ऐरोली सेक्‍टर-4 मध्ये राहणाऱ्या दत्ता बोडगे याने आपल्या घरामध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे. मोहम्मद गौस याने ऐरोली सेक्‍टर-1 मधील घरावर अनधिकृत बांधकाम केले आहे. ऐरोली सेक्‍टर-3 मध्ये राहणारे एम. व्ही. तांबे यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. गोठीवली गावात राहणाऱ्या सुनील शेलार व इतर लोकांनी गोठीवली गावातील समाज मंदिरलगत मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकाम केले आहे. तर तळवली गावात राहणाऱ्या हैदर अली याने तळवली येथील हनुमान शाळेसमोर अनधिकृत बांधकाम केल्याचे महापालिकेने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकाने या सर्वांना अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबविण्याबाबत नोटीस दिली होती. 

या सर्वांनी महापालिका प्रशासनाच्या नोटिसीला उत्तर न देता, आपले बांधकाम सुरूच ठेवले. अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या आठ जणांसह बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर रबाळे पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Criminal cases filed against unauthorized construction