छोट्या चुकीचा मोठा धडा!

Faiyz-Shaikh
Faiyz-Shaikh

फैयाज शेखकडे एकेकाळी भुरटा चोर म्हणून पाहण्यात येत होते. आता तो दरोडेखोर झाला आहे. त्याने लहान मुलांना हाताशी धरून गुन्हे केले आहेत. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याची मजल पोलिसांवर गोळीबार करण्यापर्यंत गेली आहे. त्याच्या या धाडसाला पोलिसच जबाबदार आहेत. कारण त्याच्या गुन्हेगारीच्या सुरुवातीच्या काळात त्याला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नव्हते...

सोनसाखळीचोर फैयाज शेख याने नवी मुंबई पोलिसांवर दोन दिवसांपूर्वी विरार येथे गोळ्या झाडल्या होत्या. पण पोलिसांवर हल्ला करण्याची फैयाजची ही काही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वीही त्याने गुजरात येथे नवी मुंबई पोलिसांच्या पथकावर अशाच पद्धतीने गोळीबार केला होता. त्यामुळे फैयाज एवढा निर्ढावला कसा, का तो पोलिसांच्या जीवावर उठलाय, त्याला  पोलिसांवर गोळीबार करण्याची ताकद येते कुठून, असे एक ना अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. पण फैयाजला त्याच्या पहिल्या गुन्ह्यात नवी मुंबई पोलिसांनी दिलेली सूट हे प्रमुख कारण आहे. 

तळोज्यात राहणारा फैयाज उंचपुरा आहे. त्याला जुगाराचा नाद आहे. पण, त्याला पैशांची चणचण असे. त्यातूनच ताे चोऱ्या करू लागला.  कालांतराने तो सोनसाखळी चोर झाला.   ताे दर आठवड्याला पनवेल, नवी मुंबईत किमान तीन तरी सोनसाखळ्या हिसकावत होता. खारघर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण पाटील यांनी त्याला पहिल्यांदा पकडले. त्यानंतर कुठेही सोनसाखळी चोरी झाल्यावर पोलिस फैयाजचा शोध घेत. वारंवार होणाऱ्या धरपकडीमुळे त्याने बस्तान कल्याण, ठाणे येथे हलविले. कल्याण पोलिसांनीही त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. त्यात काही काळ कारागृहात अंडासेलमध्ये त्याला ठेवण्यात आले. पण तीन वर्षांच्या शिक्षेनंतर तो पुन्हा सुटला.त्यानंतर प्रेयसीकरवी त्याला पकडण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले, मात्र तेही फसले. सध्या तो दरोड्यात गुंतला आहे. सोनसाखळी चोरण्यासाठी त्याने ५० ते ६० लहान मुलांची टोळी केल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे. 

पोलिसांमध्ये गांभीर्याचा अभाव
फैयाजप्रमाणे नवी मुंबई पोलिसांच्या हातून निसटणारा सीरियल रेपीस्ट रेहान अब्दुल रशीद कुरेशी हा सुद्धा ओवे गावात वास्तव्यास होता. त्यांच्यामध्ये हा एक समान धागा आहे. दोघांनाही त्यांच्या गुन्हेगारीच्या पहिल्याच टप्यात नवी मुंबई पोलिसांनी गांभीर्याने पािहले नव्हते. ही एक चूक नवी मुंबई पोलिसांच्या नामुष्कीत भर टाकत आहे. 

अर्थकारणातून पोखरलेली व्यवस्था
नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात कमीत कमी गुन्हे नोंदवून घेण्याचे पोलिसिंग चालते. व्यक्ती हरविली, विनयभंग व सोनसाखळी चोरी, वाहनचोरी अशा प्रकरणात तक्रारदाराला काही तास थांबा... शोधा... असे सांगतात. त्यानंतर गुन्हे नोंदवून घेतात. एखादा चोर सापडल्यावर त्याने दुसरा गुन्हा करू नये, यासाठी त्याचे मनपरिवर्तन करण्यासाठी पद्धत पोलिस वापरत नाही. तत्कालीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या कार्यकाळात नवी मुंबई फक्त पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व अर्थकारणामुळे गाजली. त्यामुळे गुन्हेगारांमध्येही सर्व काही केल्यावरही सुटू शकतो, असा संदेश गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com