सराईत गुन्हेगार फैय्याज शेख खालापुरातून जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

खालापूर : 87 हून अधिक गुन्हे; तसेच पोलिसांवर हल्ला करणारा मोक्‍कामधील सराईत गुन्हेगार फैय्याज खलिद शेख व त्याचा साथीदार सलीमला नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने अखेर शनिवारी पहाटे खालापूर येथून अटक केली. पोलिस पथकावर गोळीबार करून पळून जाण्याचा फैय्याज व सलीमचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या फैय्याजने दीड किलोमीटर अंतर सलीमला उचलून नेले. त्यानंतर ते दोघे लपून बसले होते; मात्र श्‍वान पथकाच्या मदतीने त्या दोघांचा शोध घेण्यात आला. 

फैयाज व सलीमला आश्रय देणारा खालापूरच्या नढाळ गावातील सखाराम पवार यालादेखील पोलिसांनी अटक केली आहे. जबरी चोरीसह पोलिसांवर तीन वेळा जीवघेणे हल्ला करणाऱ्या फैय्याजच्या मागावर नवी मुंबई पोलिस अनेक महिन्यांपासून होते; परंतु तो पोलिसांना हुलकावणी देत होता. शुक्रवारी रात्री त्याने दोन साथीदारांसह खारघरमध्ये पिस्तुलचा धाक दाखवून वॅगनर कार पळवून नेली. ते नढाळ येथील आदिवासीवाडीत सखाराम पवारकडे वस्तीला असल्याची माहिती मिळाल्याने नवी मुंबई पोलिस पूर्ण तयारीनिशी शनिवारी पहाटे तेथे पोहोचले होते; मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच झोपलेल्या फैय्याजने सावध होऊन पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या.

या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात फैय्याज गंभीर जखमी झाला. त्याने तशा अवस्थेत सलीमला उचलून घेत दीड किलोमीटर अंतरावर पळ काढला. मात्र, सांडलेल्या रक्‍तावरून माग काढत पोलिसांनी श्‍वान पथकाच्या मदतीने त्यांना जेरबंद केले. दोघांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बुलेटप्रूफ जॅकेटमुळे पोलिस बचावले 

नढाळच्या कारवाईत नवी मुंबईचे पाच पोलिस निरीक्षक, 30 पोलिस कर्मचारी आणि पोलिस उपअधीक्षक सहभागी झाले होते. फैयाजने केलेल्या गोळीबारात पोलिस निरीक्षक केवळ बुलेटप्रूफ जॅकेटमुळे बचावले, तर एक गोळी भिंतीत शिरली. पोलिसांना चकविण्यासाठी आणि वेढा तोडण्यासाठी फैय्याजने खिडकी आणि दरवाजातून गोळीबार केला. त्यामुळे चक्रावलेल्या पोलिसांना फैय्याजचे आणखी साथीदार असतील, असे वाटले.

Web Title: Criminal Fayyaz Sheikh Arrested from Khalapar