राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर कोपरखैरणेत मारहाणीचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नवी मुंबई - खैरणे येथील रिक्षा स्टॅंडवर रिक्षा लावण्याच्या वादातून महिनाभरापूर्वी घडलेल्या हाणामारीप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मुनावर पटेल यांच्यासह आठ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 

नवी मुंबई - खैरणे येथील रिक्षा स्टॅंडवर रिक्षा लावण्याच्या वादातून महिनाभरापूर्वी घडलेल्या हाणामारीप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मुनावर पटेल यांच्यासह आठ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

या प्रकरणातील तक्रारदार सुफियान शेख (20) हा कोपरखैरणे सेक्‍टर 12 मध्ये राहण्यास आहे. त्याचा मोठा भाऊ इम्तियाज शेख ऊर्फ सोनू (28) हादेखील रिक्षा चालवतो. सावरिया डेअरी येथील रिक्षा स्टॅंडवर रिक्षा लावू देत नसल्याच्या मुद्द्यावरून या दोघा भावांचा तेथील रिक्षाचालकासोबत वाद झाला होता. त्यामुळे हे दोघे काही महिन्यांपासून बोनकोडे गावातील स्टॅंडवर रिक्षा लावत होते. 2 नोव्हेंबरला सायंकाळी सुफियान हा स्कुटी घेऊन बोनकोडे गावातील स्टॅंडवर उभा असताना, त्या ठिकाणी रिक्षातून आलेल्या जुनेद, आलीम, फिरोज पटेल, उमर या चौघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याला जबरदस्तीने रिक्षात डांबून नगरसेवक मुनावर पटेल यांच्या कार्यालयामध्ये नेले. तेथे पटेल यांनी पातळ लोखंडी रॉडने पायावर, तोंडावर बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आपल्याला सोडून दिल्याचे सुफियान याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

पोलिस आयुक्‍तांच्या आदेशानंतर गुन्हा 
मारहाणीच्या प्रकाराबाबत सुफियान याने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर सुफियानने पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे याबाबतची तक्रार केली. त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी सोमवारी रात्री नगरसेवक मुनावर पटेल यांच्यासह जुनैद, आली, भाऊ, फिरोज पटेल, उमर, सरफुटीन आणि सोनू कान्या या आठ जणांवर मारहाण तसेच धमकावणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला.

Web Title: Criminal offense against NCP corporator in koparkhairne