तलावातील शेवाळामुळे मगरी गायब!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने भायखळ्यातील जिजामाता उद्यानात बच्चेकंपनीचा किलबिलाट सुरू आहे. पेंग्विनना पाहण्याची त्यांच्यात प्रचंड उत्सुकता आहे. परंतु, मगरी दिसत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. तलावात शेवाळ पसरल्याने मगरींचे दर्शन दुर्लभ झाले आहे.  

राणीच्या बागेतील दोन मगरी आणि दोन सुसरी असलेल्या तलावात शेवाळाची चादर पसरली आहे. मोठ्या उत्साहात मगर पाहायला आलेल्या पर्यटकांना निराशेने परतावे लागत आहे. महिनाभरापूर्वी शेवाळ काढण्यात आले होते; पण ते पुन्हा पसरले. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे शेवाळ काढण्यात येत नसल्याचे सांगण्यात येते. दुर्मिळ पेंग्विनच्या दर्शनाने पर्यटक सुखावत आहेत; परंतु उन्हाळी सुटीत पर्यटकांना मगर आणि सुसर यांचे दर्शन होत नसल्याने निराशेने परतावे लागत आहे. तलावाभोवती असलेले लोखंडी रेलिंग बहुतांश तुटलेले आहे. तलाव मोठा असल्याने कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून पाळत ठेवावी लागत आहे. लहान मुले सभोवताली असलेल्या जाळीवर चढून मगर पाहण्याचा प्रयत्न करतात. अनेक कर्मचारी सुटीवर असल्याने मुलांना हटवणे जिकिरीचे झाले आहे, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

मगरींच्या तलावातील शेवाळ नैसर्गिक असून, ते कोणालाही अपायकारक नाही. आम्ही नियमितपणे शेवाळ स्वच्छ करतो. 
- डॉ. संजय त्रिपाठी (संचालक, जिजामाता उद्यान)

Web Title: crocodile missing