खालापूरमध्ये मगरीच मगरी

शेतात सापडलेल मृत मगरीच पिल्लू.
शेतात सापडलेल मृत मगरीच पिल्लू.

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्‍यातील आसरे गावानजीक एका शेतात मगरीचे मृत पिल्लू रविवारी सकाळी सापडले. भिलवले धरणातून ते सांडव्यातील पाण्याद्वारे आले असावे, असा अंदाज आहे. गेल्या 30 जूनपासून दोन मृत पिल्ले आणि तीन मगरी आसरे परिसरात सापडल्या आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

आसरे येथील एका शेतात मृत मगरीचे पिल्लू दिसल्यानंतर रहिवाशांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल आशीष पाटील यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन ते पिल्लू ताब्यात घेतले. खालापूर येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. 

भिलवले धरण भरल्यानंतर 30 जूनला सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्या वेळीही मृत मगरीचे पिल्लू आढळले होते. त्यानंतर जवळपास तीन जिवंत मगरी प्राणीमित्र संघटना आणि वनविभागाने संयुक्त शोध मोहीम राबवून ताब्यात घेतल्या होत्या. त्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडवण्यात आले आहे. 

पाटबंधारे विभागातर्फे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला आहे; मात्र सांडव्यानजीक काहीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 
वन विभागाने ग्रामस्थ आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला आहे; परंतु धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने आणखी मगरी पाण्याबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. 

खालापूर तालुक्‍यातील आसरे गावात सापडलेले मगरीच पिल्लू अंदाजे सहा महिन्यांचे आहे. शवविच्छेदनानंतर योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. मगर दिसल्यानंतर ग्रामस्थांनी घाबरून न जाता तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. मगरीचे पिल्लू हल्ला करेल, या भीतीतून त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. 
- आशीष पाटील, वनक्षेत्रपाल, खालापूर 


भिलवले धरणाच्या सांडव्यातून मगरीचे पिल्लू वाहत शेतात जात असावेत. त्यामुळे वन विभागाने सांडव्यानजिक जाळी लावण्यासारखा प्रयोग पाटबंधारे विभागाने करणे आवश्‍यक आहे. 
- रोहिदास ठोंबरे, आसरे गाव, चौक 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com